कॅमरून ग्रीनला शाहरुख खानच्या केकेआरने 25.20 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं, याचसोबत ग्रीन आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात ग्रीन सगळ्यात महागडा खेळाडू ठरेल, असं बोललं जात होतं, पण ग्रीनला ऋषभ पंतचा 27 कोटींचा विक्रम मोडता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सने 25 कोटी रक्कम पार झाल्यानंतर लिलावातून माघार घेतली.
advertisement
केकेआरकडून आंद्रे रसेल निवृत्त झाल्यामुळे तसंच सीएसकेने जडेजाला ट्रेड केल्यामुळे दोन्ही टीमना कॅमरून ग्रीनसारख्या ऑलराऊंडरची गरज आहे. ग्रीन हा ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत कुठेही बॅटिंग करू शकतो, तसंच तो पॉवर प्ले आणि मिडल ओव्हरमध्ये फास्ट बॉलिंगही करू शकतो.
कॅमरून ग्रीन आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला, पण 2024 च्या लिलावाआधी मुंबईने हार्दिक पांड्याला टीममध्ये आणलं म्हणून ग्रीनला आरसीबीकडे ट्रेड केलं. यानंतर 2025 च्या मोसमात ग्रीन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. आयपीएलच्या 29 सामन्यांमध्ये ग्रीनने 41.59 ची सरासरी आणि 153.70 च्या स्ट्राईक रेटने 707 रन केले आहेत, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
ग्रीनला मिळणार फक्त 18 कोटी
आयपीएलच्या या लिलावामध्ये ग्रीनवर विक्रमी बोली लागली असली तरी त्याला फक्त 18 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलच्या नव्या नियमांनुसार मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूवर 18 कोटींपेक्षा जास्तची बोली लागली तर वरचे पैसे हे खेळाडू कल्याण निधीसाठी दिले जाणार आहेत. मागच्या काही वर्षात खेळाडू मुद्दाम मेगा ऑक्शनऐवजी मिनी ऑक्शनमध्ये स्वत:चं नाव नोंदवतात, असं दिसून आलं आहे. मिनी ऑक्शनमध्ये मेगा ऑक्शनपेक्षा जास्त पैसे मिळतात, त्यामुळे खेळाडूंचा कल मिनी ऑक्शनमध्ये नाव नोंदवण्यावर जास्त असतो, या कारणामुळे आयपीएलने मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला 18 कोटींपेक्षा जास्त पैसे मिळणार नाहीत, असा नियम आयपीएलने आणला आहे.
