भारताची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. खराब फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात केवळ 9 धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी सर्व सूत्रे हाती घेतली दोघांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकला.
संजू-इशान जोडीने त्यातही संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुरता समाचार घेतला. त्याने इशान सोबत दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची दमदार भागीदारी उभी केली. या भागीदारीमुळे केवळ भारताचा डाव सावरला नाही तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. टी-20 वर्ल्डकपच्या नॉकआउट सामन्यांमध्ये भारतासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
advertisement
याआधी हा विक्रम युवराज सिंग आणि रॅबिन उथप्पा यांच्या नावावर होता. त्यांनी 2007 च्या टी-20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6.3 षटकांत 84 धावांची भागीदारी केली होती. तो सामना दर्बन येथे खेळवण्यात आला होता आणि त्या भागीदारीने भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आता सॅमसन आणि इशान यांनी 97 धावांची भागीदारी करत हा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. इशान किशन 39 धावांवर बाद झाला आणि ही जोडी पुढली. मात्र इशान बाद झाल्यानंतर संजूचा धमाका सुरूच होता. त्याने 42 चेंडूत 89 धावा केल्या. ज्यात 7 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. संजूचे हे या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. याआधी त्याने गेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अशीच वादळी खेळी केली होती.
संजूने धमाकेदार सुरुवात करुन दिल्याने भारताने 20 ओव्हरमध्ये 7 बाद 253 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने 25 चेंडूत 43, हार्दिकने 12 चेंडूत 27 तर तिलक वर्माने 7 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. या सामन्यात जो विजेता होईल तो संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. फायनल मॅच 8 तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
