'चंद्रकांत पंडित यांनी नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ते कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाहीत', अशी पोस्ट केकेआरने केली आहे.
'2024 साली केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवणं आणि टीमला मजबूत आणि लवचिक करण्यात चंद्रकांत पंडित यांचं अमूल्य योगदान होतं, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्या नेतृत्वाचा आणि शिस्तीचा टीमवर कायमच प्रभाव राहिला. भविष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो', असंही केकेआर त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
चंद्रकांत पंडित प्रशिक्षक असताना केकेआरने तीन हंगामात 42 पैकी 22 सामने जिंकले आणि 18 सामने गमावले, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले. आयपीएल 2025 मध्ये केकेआरने 14 पैकी फक्त 5 मॅच जिंकल्या. पॉइंट्स टेबलमध्येही केकेआर आठव्या क्रमांकावर राहिली.
चंद्रकांत पंडित यांचा केकेआरसोबतचा प्रवास
आयपीएल 2023 च्या मोसमाआधी चंद्रकांत पंडित केकेआरचे मुख्य प्रशिक्षक झाले. आयपीएल 2022 पर्यंत ब्रेंडन मॅक्युलम केकेआरचा प्रशिक्षक होता, पण मॅक्युलम 2022 साली इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला. त्यामुळे आयपीएल 2023 आधी चंद्रकांत पंडित यांची केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, यानंतर 2023 च्या मोसमात केकेआर सातव्या क्रमांकावर राहिली.
यानंतर 2024 साली श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने आयपीएल ट्रॉफी जिंकली. याच मोसमात गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरचा मेंटर झाला होता. चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएल इतिहासातील सर्वाधिक पॉइंट्स आणि सर्वोत्तम नेट रन रेट नोंदवला.
आयपीएल 2025 मध्ये मात्र केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली. 14 सामन्यांमध्ये केकेआरला फक्त 5 मॅच जिंकता आल्या. 2 सामने शिल्लक असतानाच केकेआर प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली होती.