मुंबई/कोलकाता: जगप्रसिद्ध अर्जेंटिनियन फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. ‘GOAT टूर’च्या निमित्ताने 38 वर्षीय दिग्गज फुटबॉलपटू तीन दिवस भारतात राहणार असून, या कालावधीत तो देशातील चार प्रमुख शहरांना भेट देणार आहे. मेस्सीचा हा दौरा भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ऐतिहासिक ठरणार मानला जात आहे.
advertisement
मेस्सी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात 13 डिसेंबर रोजी करणार आहे. तो पहाटे 1.30 वाजता कोलकात्यात दाखल होणार असून सकाळी 9.30 वाजता अधिकृत कार्यक्रमांना सुरुवात होईल. कोलकात्यातील पहिला दिवस मेस्सी विविध कार्यक्रम आणि चाहत्यांशी संवाद साधण्यात घालवणार आहे.
कोलकात्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मेस्सी पुढील टप्प्यात हैदराबादकडे रवाना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तो एक मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण देशातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यानंतर मेस्सी मुंबईला भेट देणार असून, अखेरीस दिल्लीमध्ये त्याचा भारत दौरा संपणार आहे.
13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या ‘GOAT टूर’साठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, तिकिटे कशी मिळतील आणि त्यांचे दर किती असतील, याबाबत मोठी उत्सुकता आहे.
लिओनेल मेस्सीच्या ‘GOAT टूर’साठी तिकिटांची विक्री ‘District’ या अॅप आणि वेबसाइटवर सुरू आहे. बहुतांश शहरांमध्ये तिकिटांचे दर 4,500 रुपयांपासून सुरू होत आहेत. मात्र मुंबईतील कार्यक्रमासाठी तिकिटांचे किमान दर 8,250 रुपये इतके ठेवण्यात आले आहेत. तिकिटांचे कमाल दर 16,000 रुपयांपर्यंत आहेत.
याशिवाय चाहत्यांसाठी एक खास ‘मीट अँड ग्रीट’चीही संधी देण्यात आली आहे. कोलकात्यात मेस्सीच्या चाहत्यांसाठी खास भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी तब्बल 10 लाख रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. या ‘मीट अँड ग्रीट’मध्ये चाहत्यांना मेस्सीशी हस्तांदोलन करण्याची आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. अनेक चाहत्यांसाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरणार आहे.
