मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाईक हे दुसऱ्यांदा MCAचे अध्यक्ष होतील. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी संघटनेतील उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि सहसचिव या अन्य पदांसाठी निवडणूक बुधवारी होणार आहे.
advertisement
उपाध्यक्षपदाची लढत जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी यांच्या होणार आहे. तर खजिनदारपदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत होईल. सचिवपदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर आणि सहसचिवपदासाठी गौरव पायडे विरुद्ध निलेश भोसले अशी लढत होणार आहे.
अजिंक्य नाईक यांची पहिली प्रतिक्रिया...
बिनविरोध निवड झाल्यानंतर अजिंक्य नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि आधार स्तंभ शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळे हे शक्य झाले. अध्यक्षपदाबाबत कोर्टाने कोणताही अंतरीम स्टे दिलेला नाही. त्यामुळे निर्णय काय होईल ते तुम्हाला कळेलच.
बिनविरोध निवडणुकीबाबत बोलताना नाईक यांनी सांगितले की- मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब या दोघांचेही असे म्हणणे होते की जे कामकाज गेले काही काळ काम सुरू आहे ते पुढे व्यवस्थित सुरू रहावे. MCA हे आमचे कुटुंब आहे. त्यामुळे निवडणुका होत असतात काही वादविवाद पण होत राहतात. माननीय देवेंद्रजींचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. येणारी ॲपेक्स बॅाडी निर्णय घेईल.
प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया...
तुम्हाला सगळ्यांसमोर मी अजिंक्य नाईक यांना शुभेच्छा देतो. त्यांना ११ महिन्याचा कालावधी मिळाला होता. ते येत्या काळात चांगले काम करतील. अमोल काळे यांची कामे पुढे नेतील आणि पूर्ण बॅाडी निवडणून येईल त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की- ठीक आहे एक अर्ज माझ्या विरोधात आहे. जो मतदार राजा आहे तो योग्य निवड करतील. शरद पवार यांनी एक यादी ठरवली आहे, जी मुख्यमंत्री यांना सुद्धा तिच हवी आहे तर ते होईल.
अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले आणि नंतर माघार घेणारे मिलिंद नार्वेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. इच्छा सगळ्यांची असते, पण मोठ्यांचे ऐकायचे असते. त्यांनी सांगितले मी केले. गेल्यावेळी विचार केला की मी आमदार होतोय. पद हे बदलत असते.
