मिलिंद नार्वेकर यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत "हिंदुस्तान जिंदाबाद" असं लिहिलं आहे. या स्लोगनसोबत त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा इमोजी देखील पोस्ट केला. एक भारतीय म्हणून त्यांच्या या पोस्टमध्ये काहीही वादग्रस्त किंवा वेगळेपण नाहीये. पण त्यांच्या पक्षाच्या अर्थात शिवसेना ठाकरे गटाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दलच्या भूमिकेची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. या हाय-व्होल्टेज सामन्याच्या काही दिवस आधी, शिवसेनेने (यूबीटी) पाकिस्तानसोबत सामना खेळायला विरोध केला होता. असा सामना होऊ नये, पाकिस्तानला बायकॉट करावं, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली होती.
advertisement
अशात भारताने हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताच ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं. एकीकडे पक्षाने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध केला असताना नार्वेकर यांनी भारताच्या विजयानंतर पोस्ट केली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची या सामन्याबद्दल नेमकी भूमिका काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
"पंतप्रधान मोदी म्हणाले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे वाहू शकते? खेळ आणि युद्ध एकाच वेळी कसे होऊ शकते?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. "मोदींना देशभक्तीमध्ये रस नाही. त्यांना फक्त स्पर्धेतून मिळवलेल्या पैशात आणि व्यापारात रस आहे," अशी टीकाही ठाकरेंनी केली होती.