TRENDING:

Mohammad Shami : 'घरातून अडीच हजार रुपये घेऊन निघालो, शेवटचे हजार उरले, त्यानंतर...', शमीने सांगितला आयुष्यातला संघर्ष

Last Updated:

मोहम्मद शमीने वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या या फास्ट बॉलरने स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने त्याच्या आयुष्यातल्या सुरूवातीच्या संघर्षाबाबत सांगितलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 22 नोव्हेंबर : मोहम्मद शमीने वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या या फास्ट बॉलरने स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. सुरूवातीच्या 4 सामन्यांमध्ये शमीला संधी मिळाली नव्हती. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर मोहम्मद शमीचं टीममध्ये कमबॅक झालं, यानंतर त्याने मागे बघितलं नाही. टीम इंडियाला फायनलमध्ये विजय मिळाला नाही. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासात 50 विकेट घेणारा शमी पहिला भारतीय बॉलर ठरला आहे. वर्ल्ड कपमधल्या सगळ्यात यशस्वी ठरलेल्या मोहम्मद शमीने त्याच्या आयुष्यातला संघर्ष सांगितला आहे. शमी दोनवेळा उत्तर प्रदेश टीमसाठी ट्रायल द्यायला गेला, पण दोन्ही वेळा त्याला निराश होऊन परत यावं लागलं.
मोहम्मद शमीचा संघर्ष
मोहम्मद शमीचा संघर्ष
advertisement

PUMA India सोबत बोलताना मोहम्मद शमीने त्याच्या आयुष्यातल्या कठीण काळाबाबत सांगितलं. सुरूवातीला आपण मित्रांबरोबर रेतीमध्ये पळून ट्रेनिंग करायचो. रणजी खेळण्याच्या आधी आपण फक्त रनिंग करायचो, रणजी खेळायला सुरूवात केल्यानंतर मी जिममध्ये जायला सुरूवात केली, असं शमीने सांगितलं. दोन वर्ष मी उत्तर प्रदेश रणजी ट्रॉफी टीमची ट्रायल द्यायला गेलो, पण दोन्ही वेळा माझी निवड झाली नाही, तरीही पुन्हा यायचं ठरवलं, असं शमी म्हणाला.

advertisement

ट्रायलला 1600 मुलं पोहोचली

दुसऱ्या वर्षी ट्रायल द्यायला पोहोचलो तेव्हा तिथे 1600 खेळाडू होते. त्यांना 3 दिवसांमध्ये ट्रायल संपवायची होती. माझा मोठा भाऊही सोबत होता, त्याने तेव्हाच्या निवड समिती अध्यक्षांसोबत बोलणं केलं, पण त्याला जे उत्तर मिळालं त्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. माझी खुर्ची हलवू शकतोस का? तरच मुलाची निवड होईल, असं ते म्हणाल. हलवणं सोडा मी खुर्ची उलटीही करू शकतो, माझ्यामध्ये एवढी ताकद आहे, त्याच्यात दम असेल तरच त्याला घ्या, असं भाऊ बोलला. त्यावर इकडे दम असलेल्यांचं काम नाही असं म्हणत त्यांनी माझा फॉर्म फाडला.

advertisement

3 वर्ष खराब झाली

या घटनेनंतर मी पुन्हा उत्तर प्रदेश बघायचं नाही असं ठरवलं. मी लहानपणापासूनच जिद्दी होतो. मला खेळायचंच आहे, असं मी कोचला सांगितलं, त्यानंतर त्यांनी मला त्रिपुराला पाठवलं, पण तिथेही मला संधी मिळाली नाही. या सगळ्यात माझी 3 वर्ष खराब झाली, अशी खंत शमीने व्यक्त केली.

बंगालमध्ये गेला शमी

advertisement

त्रिपुरामध्येही संधी न मिळाल्यामुळे माझ्या कोचने मला कोलकात्याला पाठवलं, तिथे एका क्लबची ट्रायल होती, पण तिथली जागा छोटी होती, त्यामुळे मला तिथे पूर्ण रनअपही घेता येत नव्हता. याबद्दल क्लबला विचारलं तेव्हा त्यांनी एवढाच रनअप घ्यावा लागेल असं सांगितलं. ती खेळपट्टी सिमेंटची होती, मी 8-10 बॉल टाकले, ज्यात 2-3 आऊट केले, यानंतर मला ब्रेक देण्यात आला. ब्रेकनंतर मी पुन्हा बॉलिंग केली, यानंतर सिलेक्शनबाबत उद्या सांगितलं जाईल, असं सांगितल्याचं शमी म्हणाला.

advertisement

फक्त 1 हजार रुपये शिल्लक

मी घरातून अडीच हजार रुपये घेऊन निघालो होतो. खाण्यावर आणि राहण्यावर खर्च झाला, पण दोन दिवसानंतरही निवड झाली का नाही ते सांगितलं गेलं नाही. माझ्याकडे एक हजार रुपयेच शिल्लक होते. यानंतर क्लबच्या कर्णधाराने मला बोलावलं आणि तुझं 99 टक्के सिलेक्शन झालं आहे, पण क्लबचा मॅनेजर आणि सीईओ बघतील, असं सांगितलं. तिसऱ्या दिवशी मला निवड झाल्याचं कळवण्यात आलं, पण पैसे मिळणार नाहीत, राहायला आणि खायला मिळेल, असं स्पष्ट करण्यात आलं, असं शमीने सांगितलं.

पैसे मिळणार नाहीत हे घरी सांगितलं तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न मग कसं चालणार? असा होता. आता खेळूनच परत येईन, असं उत्तर घरच्यांना दिलं. कोलकात्यात 3 दिवस घर मिळालं नाही. मी 4 दिवस क्लब हाऊसमध्ये राहिलो. यानंतर क्लबकडून मी 9 सामन्यांमध्ये 45 विकेट घेतल्या, यानंतर मॅनेजरने मला 25 हजार रुपये आणि ट्रेनचं तिकीट दिलं. यावर माझा विश्वास बसला नाही. संपूर्ण प्रवासात मला झोप लागली नाही. घरी गेल्यावर मी 25 हजार रुपये आईला दिले, पण वडिलांनी हे पैसे आईकडून घेऊन परत मला दिले. ही माझी पहिली कमाई असल्याचं मी वडिलांना सांगितलं, पण त्यांनी या पैशांचा स्वत:साठी उपयोग कर, असं सांगितलं. या पैशातून मी बूट आणि क्रिकेटचं साहित्य विकत घेतलं. सुरूवातीला मला खूप संघर्ष करावा लागला, आज जिथे पोहोचलो आहे, त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे, हे सांगताना मोहम्मद शमी भावुक झाला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohammad Shami : 'घरातून अडीच हजार रुपये घेऊन निघालो, शेवटचे हजार उरले, त्यानंतर...', शमीने सांगितला आयुष्यातला संघर्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल