गुजरात जायंट्सने या सामन्यात पहिले बॅटिंग करताना 209 रन केल्या. नंदनी शर्माची ही फक्त दुसरीच डब्लूपीएलची मॅच होती. या हॅटट्रिकनंतर नंदनीला मोसमातील सर्वाधिक विकेटसाठी पर्पल कॅपही देण्यात आली.
सोफी डेव्हिनच्या 42 बॉलमध्ये 95 रनच्या खेळीमुळे गुजरात मोठ्या धावसंख्येकडे मजल मारत होती. जायंट्सने यंदाच्या मोसमात 2 सामन्यांमध्ये दोनवेळा 200 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. गुजरातची इनिंग संपायच्या आधी नंदनी शर्माने सामना फिरवला. तिने पहिले काश्वी गौतम, मग पुढच्या बॉलला कनिका आहुजाला आऊट केलं, यानंतर राजेश्वरी गायकवाडला पॅव्हेलियनमध्ये पाठवून नंदनी शर्माने तिची हॅटट्रिक पूर्ण केली. यानंतरही नंदनी थांबली नाही, तर तिने ओव्हरच्या शेवटच्या बॉलला रेणुका ठाकूरला माघारी धाडलं.
advertisement
नंदनीने 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला काश्वी गौतमची विकेट घेतली. यानंतर चौथ्या बॉलला तिने कनिका आहुजाला, पाचव्या बॉलला राजेश्वरी गायकवाडला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलला रेणुका ठाकूरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये नंदनीने 4 विकेट घेतल्या. तर सामन्यात तिने 33 रन देऊन 5 विकेट पटकावल्या.
नंदनी डब्लूपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारी चौथी बॉलर ठरली आहे. याआधी 2023 मध्ये इस्सी वोंग, 2024 मध्ये दीप्ती शर्मा आणि 2025 मध्ये ग्रेस हॅरिस यांनी डब्लूपीएलमध्ये हॅटट्रिक घेतली होती. डब्लूपीएलच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारी नंदनी दुसरी भारतीय बॉलर बनली आहे.
नंदनीच्या या कामगिरीनंतरही दिल्लीला पराभवाचा धक्का बसला आहे. 210 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा 4 रननी पराभव झाला आहे. 20 ओव्हरमध्ये त्यांना 5 विकेट गमावून 205 रन करता आल्या. दिल्लीचा यंदाच्या मोसमातला हा सलग दुसरा पराभव आहे, याआधी त्यांनी पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध गमावला होता.
