2012 च्या आयपीएल मोसमात एस.श्रीसंत याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या दुखापतीचे 82 लाख रुपये विमा कंपनीने राजस्थान रॉयल्सना द्यावेत, असे आदेश NCDRC ने दिले होते, त्याविरोधात विमा कंपनीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. 2012 च्या मोसमात श्रीसंत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. श्रीसंतची फिटनेस प्रमाणपत्र तसंच इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढे ढकलले आहे.
advertisement
श्रीसंतच्या पायाला झालेली दुखापत ही विमा कालावधीच्या आधीच झाली होती, असा दावा विमा कंपनी युनायटेड इन्श्युरन्सने कोर्टात केला, पण राजस्थान रॉयल्सने हा दावा फेटाळून लावला आणि श्रीसंतला झालेली दुखापत ही विमा कालावधीमध्ये झाली असल्याचं सांगितलं. सराव सत्रावेळी श्रीसंतला दुखापत झाली, असं राजस्थान रॉयल्सच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
का केला जातो खेळाडूंचा विमा?
आयपीएलमधल्या टीम खेळाडूंवर कोट्यवधींची गुंतवणूक करतात, पण आयपीएल मोसमादरम्यान खेळाडूंना दुखापत झाली तर टीमचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होतं, त्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायजी या खेळाडूंचा विमा उतरवत असतात.