टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड झालेले बाबर आझम आणि फखर झमान हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे फिट नव्हते, असा मेडिकल रिपोर्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल पॅनलने दिला आहे. बाबर आणि फखर टी-20 वर्ल्ड कपआधी त्यांच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नव्हते, असा धक्कादायक खुलासा मेडिकल पॅनलने केला आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे सीनियर सिलेक्टर आकिब जावेद यांनीही मागच्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले होते आणि निवड प्रक्रियेच्या तपासणीची मागणी केली होती.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपनंतर तपासणी
यूकेचे स्पोर्ट्स फिजियोथेरपिस्ट डॉ. जावेद मुगल यांनी वर्ल्ड कपनंतर दोन्ही खेळाडूंची तपासणी केली आणि चिंता व्यक्त केली, अशी माहिती पीसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. जानेवारी महिन्यापासून बाबर आझम आणि फखर झमान पाकिस्तान टीमच्या सोबत आहेत.
बाबरचा स्थानिक टी-20 लीग खेळायला नकार
बाबर आझमने टी-20 वर्ल्ड कपमधून परत आल्यानंतर हॅमस्ट्रिंग दुखापतीचं कारण देऊन नॅशनल टी-20 चॅम्पियनशीप खेळायला नकार दिला. तर दुसरीकडे फखर झमानही बऱ्याच काळापासून दुखापतींचा सामना करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीमध्ये बाबर आझमची दुखापत सुरूवातीच्या आकलनापेक्षा जास्त गंभीर निघाली, तर फखर झमानलाही अनेक महिन्यांपासून या दुखापतीमुळे त्रास होत आहे.
फिजियोने दिला ग्रीन सिग्नल
मेडिकल पॅनलने उपस्थित केलेल्या टीम सिलेक्शनच्या प्रश्नावर पाकिस्तानच्या निवड समितीने हात वर केले आहेत. दोन्ही खेळाडूंना टीममध्ये सामील करण्याच्या आधी टीमचे फिजियो क्लिफ डीकन यांनी फिटनेस क्लियरन्स दिला होता, असं निवड समितीचं म्हणणं आहे. फिजियो डिकन यांचे खेळाडूंसोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे छोटी दुखापत असली तरी डिकन त्यांच्या जवळच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देतात, असा आरोप डिकन यांच्यावर याआधीही झाला आहे.
बाबरचं रिहॅब सुरू
बाबर आझम हा सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या मेडिकल पॅनलच्या देखरेखीखाली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी बाबर आझमला कर्णधार करण्याची शक्यता आहे. 26 मार्चपासून पीएसएलला सुरूवात होणार आहे.
