नेमका वाद काय?
नितीश कुमार रेड्डी आणि त्याची पूर्वीची प्लेअर एजन्सी 'स्क्वेअर द वन' यांच्यातील करार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 दरम्यान संपुष्टात आला होता. त्यानंतर नितीशने त्याच दौऱ्यात असलेल्या एका अन्य भारतीय क्रिकेटपटूच्या व्यवस्थापकाशी करार केल्याचे समजते, अशी माहिती इंडिया टुडेच्या वृत्तानुसार समोर आलीये.
थकबाकी न भरल्याचा आरोप
advertisement
'स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेड' या प्लेअर मॅनेजमेंट एजन्सीने लवाद आणि सलोखा कायद्याच्या कलम 11(6) अंतर्गत ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये व्यवस्थापन कराराचे उल्लंघन आणि थकबाकी न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात 28 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.
ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यावसायिक भागीदारी
याचिकेत, कराराच्या कथित बेकायदेशीर उल्लंघनावर आणि खेळाडूने कराराशी संबंधित थकबाकी न भरल्याच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी एका स्वतंत्र मध्यस्थाच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. अहवालानुसार, 'स्क्वेअर द वन' ही एजन्सी 2021 पासून नितीश रेड्डीचे प्रतिनिधित्व करत होती. एजन्सीने रेड्डीसोबतच्या आपल्या 4 वर्षांच्या संबंधात अनेक ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यावसायिक भागीदारी मिळवून देण्यासाठी मदत केली होती.
नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त
दरम्यान, नितीश कुमार रेड्डी अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावर खेळताना दिसला होता. परंतु, दुखापतीमुळे त्याला शेवटच्या दोन कसोटीतून बाहेर पडावे लागलं. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत नितीश रेड्डीला संधी मिळाली होती. मात्र, त्याला खास कामगिरी करता आली नाही. दुखापतीनंतर त्याच्या जागी शादुल ठाकूर याने मोर्चा सांभाळला आहे.