ऑस्ट्रेलियात खेळाडूंना अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचं उघड केलं आहे. मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मॅच खेळण्यापूर्वी चक्क भांडी घासावी लागली आणि रस्ते झाडावे लागलं, असा खळबळजनक खुलासा कॅप्टनने लाहोर एअरपोर्टवर मीडियाशी बोलताना केला. या दौऱ्याची सुरुवातच पाकिस्तानसाठी अत्यंत खडतर राहिली. सिडनी एअरपोर्टवर पोहोचल्यावर संपूर्ण टीमला तब्बल 14 तास ताटकळत बसावे लागले.
advertisement
त्यानंतर जेव्हा टीम कॅनबेरा येथे पोहोचली, तेव्हा हॉटेलचे बुकिंगच झाले नसल्याचे समोर आले. फेडरेशनने हॉटेलचे पैसे न भरल्यामुळे खेळाडूंना अनेक तास रस्त्यावर भटकावे लागले. विशेष म्हणजे, अशा मानसिक आणि शारीरिक त्रासानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळावी लागली, ज्यामध्ये पाकिस्तानचा 2-3 असा पराभव झाला.
कॅप्टन बट याने फेडरेशनच्या ढिसाळ नियोजनाचे वाभाडे काढताना सांगितले की, 13 दिवसांच्या दौऱ्यासाठी केवळ 10 दिवसांचे राहण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेवटच्या 3 दिवसांत खेळाडूंना अत्यंत स्वस्त आणि गैरसोयीच्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागले. खेळाडूंनी याबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची धमकी देऊन गप्प करण्यात आले. "आम्ही जे तिथे भोगले ते कोणत्याही खेळाडूसाठी असह्य आहे," अशा भावना बट याने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पाकिस्तानातील क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने स्पष्ट केलं आहे की, त्यांनी टीमच्या निवासासाठी आणि इतर खर्चासाठी 10 मिलियन पाकिस्तानी रुपयांहून अधिक निधी दिला होता. इतकी मोठी रक्कम देऊनही खेळाडूंना भांडी घासावी लागली असतील, तर तो पैसा नेमका गेला कुठं, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पीएसबीच्या महासंचालकांनी या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट तयार केला आहे.
