सहकार्य मिळण्याऐवजी मानसिक त्रास
भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर पोलव्हॉल्ट खेळाडू देवकुमार मीना, त्याचे सहकारी आणि कोच घनश्याम यांना पनवेल रेल्वे स्थानकावर अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. या खेळाडूंनी आपल्या क्रीडा साहित्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे विनवणी केली, मात्र त्यांना सहकार्य मिळण्याऐवजी मानसिक त्रास दिला गेला. एक तर मोठा दंड भरा किंवा तुमचे महागडे साहित्य स्टेशनवरच सोडून जा, असा अजब पवित्रा रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
राष्ट्रीय विक्रम मोडला
देवकुमार हा पोलव्हॉल्टमधील देशाचा मानबिंदू असून त्याने जर्मनीत 5.40 मीटरची कामगिरी नोंदवत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. हे खेळाडू मंगळुरू येथील अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होऊन परतत असताना हा प्रकार घडला. तिकीट तपासनीसाने त्यांना त्यांचे 'पोल' हटवण्यास सांगितले आणि हे क्रीडा साहित्य असल्याचा दावा मान्य करण्यास नकार दिला, ज्यामुळे वादाची ठिणगी पडली.
प्रत्येकी 2 लाख रुपये किंमतीचे 7 पोल
कोच घनश्याम यांनी सांगितले की, त्यांनी खेळाडूंची मेडल आणि प्रमाणपत्रेही दाखवली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पोलव्हॉल्टचे हे 'पोल' 5 मीटर लांब असल्याने ते सामान्य लगेजमध्ये मावत नाहीत. हे साहित्य फायबरचे असून प्रत्येकी 2 लाख रुपये किंमतीचे 7 पोल त्यांच्याकडे होते. रेल्वेच्या डब्यात हे पोल तुटण्याची भीती असतानाही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली.
देशासाठी मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना...
अखेर कोणताही पर्याय न उरल्याने खेळाडूंना मोठा दंड भरावा लागला, त्यानंतरच त्यांना त्यांचे साहित्य नेण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकारामुळे खेळाडूंमध्ये तीव्र संताप असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशासाठी मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना स्वतःच्याच देशात अशा प्रकारे वागणूक मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे बोलले जात आहे.
क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप करावा
दरम्यान, क्रीडा साहित्याच्या वाहतुकीबाबत रेल्वेचे स्पष्ट नियम असूनही नॅशनल लेव्हलच्या खेळाडूंना असा त्रास झाल्याने रेल्वेच्या कारभारावर टीका होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खेळाडूंच्या या मनस्तापामुळे सध्या क्रीडा विश्वातून रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध केला जात असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
