कोलकाता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ईडन गार्डन्स येथे झालेल्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त 124 धावांची गरज असताना टीम इंडियाचे सर्व फलंदाज फक्त 93 धावांवर बाद झाले. या मॅचसाठीच्या पिचवरून आता मोठा वाद सुरू झाला आहे.
advertisement
या कसोटीत विकेट्सचा अक्षरशः घसरगुंडी पाहायला मिळाली. मॅचच्या पहिल्या दिवशी 11, दुसऱ्या दिवशी 15 आणि तिसऱ्या दिवशीही विकेट्स पडण्याचा क्रम सुरूच होता. या सामन्यातील कोणत्याही डावात 200 हून अधिक धावा झाल्या नाहीत, ज्यामुळे फलंदाजीसाठी ही खेळपट्टी किती कठीण होती हे स्पष्ट होते. विकेट्स सातत्याने पडत राहिल्याने पिचवर जोरदार टीका झाली आणि सामना तिसऱ्याच दिवशी संपण्याच्या मार्गावर होता. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी या खेळपट्टीवर तीव्र नाराजी व्यक्त करत टेस्ट क्रिकेटला मस्करी बनवले आहे असे म्हटले आणि हॅशटॅगमध्ये #RIPTESTCRICKET चा वापर केला.
दरम्यान क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी या पिच वादावर मोठा खुलासा केला. News18 बांग्लाशी बोलताना गांगुली यांनी स्पष्ट केले की, क्यूरेटर सुजान मुखर्जी यांचा कोणताही दोष नाही, कारण खेळपट्टी भारतीय टीम मॅनेजमेंटच्या मागणीनुसारच तयार करण्यात आली होती. गांगुली यांनी सांगितले की- पिच भारतीय टीमला हवी तशीच तयार झाली होती. चार दिवस पाणी न दिल्यामुळे खेळपट्टी इतकी कोरडी आणि फलंदाजीसाठी कठीण बनली. ज्यामुळे फलंदाजी करणे अत्यंत मुश्किल झाले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावांवर तर दुसरा डाव 153 धावांवर आटोपला, तर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 189 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (नाबाद ५५) हा या सामन्यातील कोणत्याही फलंदाजाने केलेला सर्वाधिक वैयक्तिक स्कोर ठरला. भारताला विजयासाठी124 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा फक्त 93 धावांवर ऑलआऊट झाला.
