एबी डिव्हिलियर्स त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या लाईव्ह कार्यक्रमात बोलत होता. 'कधीकधी तुम्हाला फुटबॉल प्रीमियर लीगमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळतं. जिथे मॅनेजर आणि प्रशिक्षकावर नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकवण्यासाठी दबाव असतो. तसं झालं नाही तर त्याच्यात आणि टीमचे मालक यांच्यात मदभेद व्हायला लागतात. राहुल द्रविडच्या बाबतीतही असंच झाल्याचं वाटत आहे. द्रविडला बाहेर केलं गेले, जे आदर्श असू शकत नाही', असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला आहे.
advertisement
'कदाचित राजस्थान येत्या हंगामासाठी वेगळा विचार करत असेल. कदाचित त्यांना काही गोष्टींमध्ये बदल करून पुढे जायचं असेल. यावर्षीचा त्यांचा लिलाव चांगला झाला नाही. त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंना सोडून दिलं. जॉस बटलरला सोडणं ही सगळ्यात मोठी चूक होती. तुम्ही एक किंवा दोन जणांना सोडू शकता, पण तुम्ही टीमचा मोठा भाग एकत्र जाऊ दिला, तिथून टीमची घसरण सुरू झाली', असं वक्तव्य एबी डिव्हिलियर्सने केलं आहे.
राहुल द्रविडने 2012 आणि 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं, यानंतर पुढचे दोन हंगाम द्रविड राजस्थानचा मार्गदर्शक होता. आता आयपीएल 2025 आधी द्रविड पुन्हा राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक बनला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानने 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे टीम नवव्या क्रमांकावर राहिली. या मोसमात संजू सॅमसन फक्त 9 सामने खेळला, त्याच्या गैरहजेरीमध्ये रियान परागने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.