राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर रवींद्र जडेजाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे जडेजा राजस्थानचा पुढचा कर्णधार असू शकतो, याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. राजस्थान रॉयल्सने जडेजाच्या फोटोला 'थलापथी' असे कॅप्शन दिले आहे, ज्याचा अर्थ "कमांडर" असा होतो. जर तसे असेल तर, रवींद्र जडेजा आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कमांडर किंवा नेता असू शकतो. जडेजाला सीएसकेकडून 18 कोटी रुपये वर्षाला मिळत होते, पण त्याने 14 कोटी रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचे सामने पुण्यात खेळवल्या जाऊ शकतात असे वृत्त आयएएनएसने दिले आहे. जयपूरची जागा घेऊन पुणे हे पुढील हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचं होम ग्राउंड बनू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात करार होण्याच्या जवळ आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सुरू असलेल्या मतभेदांमुळे, राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने पुढील हंगामासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमला आपले होम ग्राउंड न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने आरआर फ्रँचायझीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केल्यानंतर हे मतभेद निर्माण झाले. राजस्थान रॉयल्सने हे आरोप फेटाळून लावले आणि खोट्या आरोपांवर कठोर कारवाईची मागणी केली.
पुण्यासोबतच गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियम हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड असू शकते. लवकरच याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
