मंगळवारी टीआय मुरुगप्पा मैदानावर हिमाचल प्रदेशविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 122 बॉलमध्ये 100 रनचा टप्पा गाठला, ज्यामध्ये एकूण 10 फोरचा समावेश होता. या इनिंगमध्ये त्याने एकूण 144 बॉलचा सामना केला आणि 10 फोर तसंच 4 सिक्सच्या मदतीने 133 रन केल्या.
ऋतुराज गायकवाडने त्याचा सहकारी अर्शीन कुलकर्णीसह दुसऱ्या विकेटसाठी 269 बॉलमध्ये 220 रनची शानदार पार्टनरशीप केली. कुलकर्णीने या सामन्यात 190 बॉलमध्ये 146 रनची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 16 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. ऋतुराज गायकवाडची ही कामगिरी देखील खास आहे कारण तो काही काळापासून भारतीय टीमबाहेर आहे. ऋतुराजने भारताकडून शेवटचा सामना 13 जुलै 2024 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळला, पण त्या सामन्यातही त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
advertisement
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर
आयपीएलच्या 2025 च्या मोसमात ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो संपूर्ण मोसम खेळू शकला नाही. आता बुची बाबू स्पर्धेत खणखणीत शतक झळकावून ऋतुराजने स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. याआधी बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऋतुराजला छत्तीसगडविरुद्ध फक्त 1 आणि 11 रन करता आल्या होत्या.