मी देखील व्हायरल व्हिडीओ पाहिलाय- सचिन तेंडूलकर
सचिनच्या बॉलिंगबद्दल अनेकदा चर्चा होते की, त्याला फक्त एक ओव्हर बदलण्यासाठी आणलं होतं, पण सचिनने हा दावा खोडून काढला. तो म्हणाला की, "सौरवने मला फक्त एका ओव्हरसाठी बोलावलं नव्हतं. मी देखील व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला आहे. मला चांगलंच आठवतंय की सौरवने मला विचारलं होतं की, तू या एन्डवरून बॉलिंग का करत नाही? त्या काळात मी नियमितपणे टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलिंग करायचो आणि महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स काढून द्यायचो", असा खुलासा सचिनने 25 वर्षानंतर केला आहे.
advertisement
सौरव गांगुली सचिनकडे आला अन्...
सचिनने त्या डावात सलग 11 ओव्हर्स टाकल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन मुख्य बॅटर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे टीम इंडियाला विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी हरभजन सिंग अप्रतिम गोलंदाजी करत होता, मात्र मधल्या काळात विकेट्स मिळणं कठीण झालं होतं. सचिनने सांगितलं की, जेव्हा एखादी टीम दोन सत्रांपेक्षा जास्त बॅटिंग करते, तेव्हा त्यांना आऊट करणं सोपं नसतं. एखादी जोडी मैदानावर स्थिरावली की भागीदारी वाढण्याची भीती वाटू लागते. अशा वेळी सौरव गांगुली सचिनकडे आला आणि म्हणाला, "तू या एन्डने बॉलिंग का करत नाहीस?" सचिनने गांगुलीचं लगेच ऐकलं अन् पॅव्हेलियन एन्डने बॉलिंग सुरू केली आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स काढून मॅच भारताच्या बाजूने झुकवली होती.
शेन वॉर्नची विकेट, 'गुगली'वर आऊट
दरम्यान, सचिनच्या स्पेलमधील सर्वात चर्चेत असलेली विकेट म्हणजे शेन वॉर्नची विकेट... सचिनने वॉर्नला एका अप्रतिम 'गुगली'वर आऊट केलं होतं. वॉर्न स्वतः लेग स्पिनचा जादूगार होता, पण त्यालाही सचिनचा तो बॉल ओळखता आला नाही. जेव्हा त्याच्यासारखा पार्ट-टाईम बॉलर येतो, तेव्हा त्याने बॅटर्सला चकवण्यासाठी सतत प्रयोग करणे गरजेचे असते, असं सचिन म्हणतो. वॉर्नच्या विकेटसाठी त्या गुगलीवर इतका टर्न मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती आणि तिथेच गेम बदलला, असंही सचिनने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
