सजनाच्या आयुष्यातला संघर्ष
सजनाने मारलेल्या एका सिक्समुळे तिचं आयुष्य बदललं, पण त्याआधी तिला खूप संघर्ष करावा लागला. पूरामध्ये सजनाने तिचं घर गमावलं, वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचं पोट भरत होते. घरामध्ये मदत व्हावी म्हणून सजना स्वतः क्रिकेट खेळून तुटपुंजी कमाई करायची. पण आता या कठोर परिश्रमाचं फळ तिला मिळालं आहे.
सजनाला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यात रस होता. सजना जिल्ह्यासाठी खेळायची तेव्हा तिला 150 रुपये मिळायचे. पैसे वाचवून जेव्हा 300-600 रुपये व्हायचे तेव्हा मी ते पालकांना द्यायचे, असं सजनाने सांगितलं. सजनाची आई शारदा पंचायतीची माजी सदस्य होती, तर तिचे वडील ऑटोरिक्षा चालवायचे.
advertisement
केरळच्या पूरात सगळं उद्ध्वस्त
सजनाचा जन्म 4 जानेवारी 1995 रोजी केरळमधील मनंतवाडी येथे झाला. आता 30 वर्षांच्या असलेल्या सजनाने लहानपणापासूनच गरिबी अनुभवली. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरात 483 जणांचा मृत्यू झाला. या पुरात सजनाचे घरही कोसळले. तिने तिचे क्रिकेट किट आणि ट्रॉफीसह सर्व काही गमावले. तामिळ अभिनेता शिवकार्तिकेयन, ज्यांच्याशी तिचे चांगले संबंध आहेत, त्यांनी या कठीण काळात तिला मदत केली.
आधी केरळच्या पूराने कहर केला आणि नंतर 2020 पासून, कोविड-19 जगभरात पसरला. या काळात, सजना आणि तिच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षणीयरीत्या बिकट झाली. पुरानंतर, सजनाला शिवकार्तिकेयनचा फोन आला, तिने तिला काही मदत हवी आहे का? असे विचारले. सजनाने अभिनेत्याला सांगितले की तिने पुरात तिची क्रिकेट किट गमावली आहे. त्यानंतर अभिनेत्याने तिला एक नवीन किट पाठवली.
एका सिक्सने आयुष्य बदललं
2024 च्या WPL दरम्यान सजनाचं जीवन बदलणारा क्षण आला. तिला मुंबई इंडियन्सने 10 लाख रुपयांना विकत घेतले. यानंतर सजनाला तिच्या पहिल्याच WPL सामन्यात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. ऑलराऊंडर म्हणून खेळताना सजनाने तिच्या पदार्पणाच्या सामन्यात धमाका केला.
पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर पाच रनची आवश्यकता होती. तेव्हा प्रचंड दबावाखाली सजनाने सिक्स मारून मुंबईला थरारक विजय मिळवून दिला, यामुळे सजना क्रिकेट विश्वात रातोरात स्टार झाली.
