एक लीडर म्हणून धोनीला साथ
संजू सॅमसनने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी आपली प्रचंड उत्सुकता दर्शवली आहे. धोनीला क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखले जाते आणि त्याच्या याच शांत स्वभावाचे संजूने विशेष कौतुक केले आहे. संजू म्हणाला की, त्याला धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचे आहे आणि एक लीडर म्हणून त्याला साथ द्यायची आहे. धोनीचा शांत आणि संयमी स्वभाव त्याला खूप भावतो, त्यामुळे त्याच्यासोबत कनेक्ट होणे अधिक सोपे जाईल, असे संजूला वाटते. धोनीला ज्या प्रकारे मदतीची गरज असेल, त्या प्रकारे सपोर्ट करण्यास आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
advertisement
चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये...
चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल आपण खूप चांगले ऐकले असल्याचेही संजूने या मुलाखतीत सांगितले. अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी त्याला सांगितले आहे की, चेन्नईचे ड्रेसिंग रूम हे IPL मधील सर्वात उत्कृष्ट वातावरणांपैकी एक आहे. जेव्हापासून त्याने आयपीएल खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून चेन्नई सुपर किंग्ज हा एक प्रतिस्पर्धी म्हणून किती मोठा संघ आहे, हे त्याने अनुभवले आहे. या संघाचा इतिहास आणि त्यांचे विजेतेपद मिळवण्याचे सातत्य या गोष्टी नेहमीच त्याच्या मनावर बिंबल्या गेल्या आहेत.
एक भाग्याची गोष्ट
दरम्यान, गेल्या 5 महिन्यांपासून आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो, असे संजूने आवर्जून सांगितले. चेन्नईच्या 'यलो जर्सी'मध्ये खेळणे हे आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट असल्याचे तो मानतो. हा बदल त्याच्यासाठी अतिशय रोमांचक असून, तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आगामी हंगामात संजू सॅमसन चेन्नईकडून कशी कामगिरी करतो आणि धोनीसोबत त्याची जोडी कशी जमते, हे पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.
