'बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्याकांड सुरू आहे, मुली-बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि भारत विरोधी नारे दिले जात आहेत, तरीही शाहरुखने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला साडे नऊ कोटी रुपयांना विकत घेतलं. शाहरुखने देशातल्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत', अशी टीका भाजप नेते संगीत सोम यांनी केली आहे. मेरठमध्ये आयोजित अटल स्मृती संमेलनात संगीत सोम यांनी हे विधान केलं आहे.
advertisement
'मुस्तफिजूर रहमान सारख्या खेळाडूला भारतात पायही ठेवून देणार नाही. देशात वेगवेगळ्या प्रकारे गद्दार काम करत आहेत, अशा लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. माझं बोलणं कडवट वाटेल, पण कुणी स्पष्ट बोललं नाही तर ही गद्दारी अशीच सुरू राहिल', असं संगीत सोम म्हणाले आहेत.
पाकिस्तानवरूनही शाहरुखवर टीका
भाजप नेतने संगीत सोम यांनी शाहरुख खानने पाकिस्तानला निधी दिल्याचा आरोपही केला. देशाच्या जनतेने तुम्हाला नाव आणि संपत्ती दिली, त्याच लोकांच्या पैशांवर तुम्ही देशाविरोधात काम करत आहात. हे देशभक्तीविरोधात आहे आणि या गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असं वक्तव्य संगीत सोम यांनी केलं आहे.
देवकी नंदन ठाकूर यांचा इशारा
कथावाचक देवकी नंदन ठाकूर यांनीही शाहरुख खानचा तीव्र शब्दात विरोध केला. मथुरेमध्ये कथा सांगताना देवकी नंदन ठाकूर यांनी केकेआरच्या मॅनेजमेंटला इशारा दिला. भारतामध्ये कोणत्याही बांगलादेशी खेळाडूला खेळण्याची परवानगी देता कामा नये. जर शाहरुख बांगलादेशी खेळाडूला बाहेर करणार नसेल तर हिंदू समाजाने केकेआरवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी देवकी नंदन ठाकूर यांनी केली आहे. राजकीय दबाव वाढत असताना आता शाहरुख खानची टीम मुस्तफिजूर रहमानबद्दल काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे.
