मी निराश झालोय... - श्रेयस अय्यर
सामन्यानंतरच्या मुलाखतीत अय्यरने संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली, परंतु संघातील खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तो म्हणाला, "खरं सांगायचं तर खूप निराश झालो आहे, पण आमच्या मुलांनी ज्या प्रकारे प्रदर्शन केले, ज्या प्रकारे आम्ही हे आव्हान स्वीकारले, ते कौतुकास्पद आहे. व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि ज्या प्रत्येक व्यक्तीने यात भाग घेतला आणि योगदान दिले त्यांना खूप श्रेय जाते."
advertisement
मॅच कुठं फिरली?
सामन्याबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, "माझ्या मते, २०० धावा हे एक चांगले लक्ष्य होते, कारण खेळपट्टी थोडी संथ होती. पण त्यांनी (RCB) उत्कृष्ट गोलंदाजी केली, विशेषतः कृणाल पांड्याने. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्याने अनेक वर्षांपासून हे करून दाखवले आहे. माझ्या मते, तोच सामन्याचा टर्निंग पॉईंट होता."
युवा खेळाडूंचं कौतूक
पंजाबच्या संघात अनेक युवा खेळाडू होते ज्यांनी आपला पहिला हंगाम खेळला. त्यांच्या कामगिरीबद्दल अय्यर म्हणाला, "या संघात अनेक युवा खेळाडू आहेत जे आपला पहिला हंगाम खेळत आहेत. त्यांनी दाखवलेला निर्भय स्वभाव खरोखरच विलक्षण होता. मी हेच पुन्हा पुन्हा सांगत राहीन, पण इथे असलेल्या आणि योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, सपोर्ट स्टाफला, व्यवस्थापनाला सलाम. त्यांच्याशिवाय आम्ही इथे नसतो, त्यांना सलाम."
पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकायची - अय्यर
पुढे बोलताना अय्यरने भविष्यासाठी आशा व्यक्त केली. "काम अजून अर्धे झाले आहे, आपल्याला इथेच राहायचे आहे आणि पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकायची आहे. निश्चितच, आम्ही ज्या प्रकारे आलो आणि प्रत्येक खेळाडूने पुढे येऊन सामना जिंकू शकतो असे म्हटले, त्यातून अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत. संघात अनेक युवा खेळाडू आहेत, मला खात्री आहे की त्यांना या सामन्यातून खूप अनुभव मिळाला आहे. मला खात्री आहे की ते पुढच्या वर्षी येतील तेव्हा त्यांच्यासोबत प्रचंड अनुभव असेल. त्या आधारावर आम्ही काही रणनीती आणि डावपेच तयार करू शकतो जेणेकरून आम्ही काही चांगला क्रिकेट खेळू शकू," असे तो म्हणाला.
दरम्यान, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कृणाल पांड्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' तर सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्काराने गौरवण्यात आले.