स्मृती मानधनाने 2013 साली पदार्पण केलं. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमचा विजय झाला, त्यातही स्मृतीने चमकदार कामगिरी केली. वर्ल्ड कपमधल्या या प्रवासावरही स्मृतीने प्रतिक्रिया दिली आहे. 'मला वाटत नाही की मी क्रिकेटपेक्षा जास्त कशावर प्रेम करते. भारताची जर्सी घालणे ही माझी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या समस्या बाजूला ठेवता आणि हेच तुम्हाला जीवनावर लक्ष केंद्रित करायला मदत करते', असं स्मृती अमेझॉन संभव संमेलनामध्ये बोलताना म्हणाली.
advertisement
कधीकधी गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत
'मला लहानपणापासूनच बॅटिंगचं वेड आहे. मला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं आहे, हे माझ्या कायमच मनात होतं, पण मी ते कुणाला सांगितलं नव्हतं. ही ट्रॉफी टीमच्या दीर्घ संघर्षाचं फळ आहे. आम्ही वर्षानुवर्षे सहन केलेल्या संघर्षांचं बक्षीस म्हणजे हा वर्ल्ड कप आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. मी 12 वर्षांहून अधिक काळ खेळत आहे. कधीकधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. फायनलआधी आम्ही आमच्या मनात काही गोष्टी पाहिल्या, त्या प्रत्यक्षात पाहताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा एक अविश्वसनीय आणि खूप खास क्षण होता', असं वक्तव्य स्मृतीने केलं आहे.
'फायनलमध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना पाहून भावनिक झालो. आम्हाला त्यांच्यासाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून वाटलं की संपूर्ण महिला क्रिकेट जिंकत आहे. ही लढतही त्यांचा विजय होता. तुम्ही मागच्या इनिंगमध्ये शतक केलं असलं तरी पुढचा डाव शून्यापासून सुरू होतो. कधीही स्वतःसाठी खेळू नका, आम्ही एकमेकांना याची आठवण करून देत राहिलो', असंही स्मृतीने सांगितलं.
स्मृती पुन्हा मैदानात परतणार
स्मृती मानधना 21 डिसेंबरपासून पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. हे सामने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरममध्ये खेळवले जातील.
