बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतामध्ये खेळायला नकार दिला, तसंच आपले सामने श्रीलंकेमध्ये खेळवावेत, असा आग्रह धरला. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला. बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेटवर कारवाई होणार?
आयसीसीची कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार न टाकता भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणारा हा सामना आता होणार नाही, त्यामुळे टीम इंडियाला या सामन्याचे 2 पॉईंट्स मिळतील. या परिस्थितीमध्ये आयसीसीला कारवाई करणं कठीण जाईल, कारण पाकिस्तानने बहिष्कार म्हटले तरी 2 पॉईंट्स गमावणे म्हणजेच सामना गमावणे, जे कायद्याचे उल्लंघन होत नाही, असं पाकिस्तानला वाटत आहे.
advertisement
पाकिस्तान एकटं पडणार
टी-20 वर्ल्ड कप ही आयसीसी स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेतून मिळणारा महसूल सहभागी देशांना दिला जातो. भारत-पाकिस्तान सामना न झाल्यामुळे आयसीसीचं उत्पन्न कमी होईल, ज्यामुळे इतर देशांना मिळणारा महसूलही घटेल. या कारणामुळे पाकिस्तानला इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या रोषाचा सामना करावा लागेल. आयसीसीच्या बैठकीमध्ये सगळी क्रिकेट बोर्ड पाकिस्तानचा महसुली वाटा कमी करण्याबाबत ठराव पास करून तो बहुमताने पास करून घेऊ शकतात.
सरकारचा हस्तक्षेप
दुसरीकडे पाकिस्तान सरकारनेच भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू नका, असे जाहीर आदेश पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सरकारचा हा हस्तक्षेप असल्याचं दाखवून आयसीसी त्यांच्या कायद्याच्या कलम 2.4 (ड) अंतर्गत कारवाई करू शकते.
आयसीसीसोबत करार
आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तानचे सामने तटस्थ देशांमध्ये खेळण्याचा करार झाला आहे. हा करार आयसीसी, बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये आहे, ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचीही स्वाक्षरी आहे. पाकिस्तानने या कराराचं उल्लंघन केल्याचं सांगून आयसीसी त्यांच्यावर दंडात्मक तसंच निलंबनाची कारवाईही करू शकते.
...तर पाकिस्तानवर ओढावणार नामुष्की
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाच्या शक्यता कमी होत्या, पण पाकिस्तान अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियाला हरवून सुपर एट मध्ये प्रवेश मिळवू शकते. पाकिस्तानने सुपर एट, सेमी फायनल किंवा फायनलमध्येही भारताविरुद्ध खेळायला नकार दिला, तर हा डाव त्यांच्यावरच उलटेल, कारण या सामन्यांमध्ये माघार म्हणजे स्वत:चं आव्हान संपुष्टात करून पाकिस्तान भारताचा मार्ग मोकळा करून देईल, ज्यामुळे त्यांना आणखी टीकेचा सामना करावा लागेल.
भारताविरुद्धच्या सामन्याचे 2 पॉईंट्स बहिष्कारामुळे गमावल्यानंतर पाकिस्तानला अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल, पण या सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला तर त्यांचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल, ज्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवेल.
