टीम इंडियासाठी उरलेले दोन्ही सामने हे करो या मरो असेच आहेत, पण झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फिनिशर संघाची साथ सोडून अचानक घरी गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया सोमवारी चेन्नईमध्ये दाखल झाली, कारण भारत-झिम्बाब्वे यांच्यातला सामना इथे होणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी रिंकू सिंगने टीम इंडियाची साथ सोडली आहे. कुटुंबामध्ये मेडिकल इमरजन्सी आल्यामुळे रिंकू चेन्नईहून थेट त्याच्या घरी गेला आहे. टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये रिंकू दिसला नाही, त्यानंतर हे वृत्त समोर आलं आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकूच्या वडिलांवर मागच्या वर्षभरापासून कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये रिंकूच्या वडिलांची तब्येत आणखी बिघडली आहे, त्यामुळे रिंकू वडिलांना भेटायला गेला आहे. बीसीसीआयकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रिंकू सिंग टीम इंडियामध्ये परत कधी येणार? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रिंकू सिंगची कामगिरी निराशाजनक झाली आहे. वर्ल्ड कपच्या 5 सामन्यांमध्ये रिंकूला फक्त 24 रनच करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 च्या सामन्यात रिंकू शून्य रनवर आऊट झाला. तर ग्रुप स्टेजमध्ये त्याने युएसएविरुद्ध 14 बॉल 6, नामिबियाविरुद्ध 6 बॉलमध्ये 1, पाकिस्तानविरुद्ध 4 बॉलमध्ये 11 आणि नेदरलँड्सविरुद्ध 3 बॉल 6 रन केले.
टीम इंडियाची नेट प्रॅक्टिस
टीम इंडियाकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी बराच वेळ नेटमध्ये बॅटिंग केली. तर अभिषेक शर्मा बॉलिंग केल्यानंतर बॅटिंगसाठी उतरला. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसमोर बॉलिंग केली. तर जसप्रीत बुमराहने बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कलसोबत सिक्ल बेस्ड सेशनमध्ये भाग घेतला.
