दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट मायनस 3.800 झाला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3800 आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 107 रननी पराभव केल्यामुळे त्यांचा नेट रनरेट तब्बल +5.350 झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या एवढ्या बलाढ्य नेट रनरेटमुळे भारताला नेट रनरेटच्या आधारावर सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे, त्यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. तसंच दक्षिण आफ्रिकेने त्यांचे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धचे सामने जिंकावे यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे, पण उलटफेर झाला तर मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचआधीच टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका सामना समीकरण फिरवणारा
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे, पण त्याच दिवशी दुपारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होईल. या सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं जवळपास अशक्य होईल.
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, त्यामुळे ज्या दोन टीमचा नेट रनरेट जास्त असेल त्या टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सध्याची पॉईंट्स टेबलची परिस्थिती पाहिली तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेपेक्षा टीम इंडिया नेट रनरेटमध्ये खूपच मागे आहे. टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये मोठमोठे विजय मिळवणं सध्या तरी टीम इंडियासाठी कठीण दिसत आहे.
