आयपीएलच्या मेगा लिलावात मध्य प्रदेशचा ऑलराऊंडर वेंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याच्यापेक्षा फक्त ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना मोठी बोली लागली होती. म्हणूनच वेंकटेश अय्यरकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा होत्या, पण आयपीएलचा हा मोसम वेंकटेश अय्यरसाठी निराशाजनक ठरला. त्याने 7 इनिंगमध्ये 142 रन केल्या आणि 11 सामन्यांपैकी एकाही सामन्यात बॉलिंग केली नाही.
advertisement
टीकाकारांवर अय्यरचा पलटवार
30 वर्षांच्या व्यंकटेश अय्यरने त्याच्यावर होणाऱ्या टीकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अय्यर बोलत होता. मी अशाच लोकांच्या टीकेकडे लक्ष देतो, ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यावर परिणाम होतो, असं अय्यर म्हणाला आहे. ज्यांनी माझ्यावर टीका केली, ते माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्येही नाहीत, मग ते काय बोलतात, याचा विचार करण्याची गरज मला आहे का? हे माझं आयुष्य आहे. माझा खेळ आणि माझं करिअर आहे. माझ्या टीमने माझ्यावर इतका खर्च करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे या गोष्टींचा परिणाम माझ्यावर होत नाही, असं प्रत्युत्तर व्यंकटेश अय्यरने दिलं आहे.
'गेल्या काही वर्षांत मी खूप काही शिकलो आहे. फक्त मीच नाही तर सर्व क्रिकेटपटूंनी हे शिकलं आहे. तुमच्यावर खूप लक्ष दिलं जातं, म्हणून कोणाकडे लक्ष द्यायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मी फक्त अशा लोकांप्रती जबाबदार आहे ज्यांचा माझ्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे', अशी प्रतिक्रिया व्यंकटेश अय्यरने दिली आहे. असं असलं तरी आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू नये, असंही अय्यर म्हणाला.
'अनेक लोकांची मतं असतात, ती चांगली आणि वाईट असू शकतात, पण मी फक्त त्यांच्याकडूनच मत घेतो जे माझ्यावर थेट प्रभाव पाडतात', असं वक्तव्य व्यंकटेश अय्यरने केलं आहे. व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत 62 आयपीएल सामन्यांमध्ये 1468 रन केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.