विराट आणि रोहित निवृत्त होणार?
टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपबद्दल भाष्य केलं. 2027 चा वर्ल्ड कप लक्षात घेऊन रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं आहे, असं अजित आगरकर यांनी सांगितलं.
रोहित शर्मा हा आता 38 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत तो 40 वर्षांचा असेल. पुढच्या 2 वर्षांमध्ये टीम इंडिया फार कमी वनडे मॅच खेळणार आहे, तसंच रोहित फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्यामुळे वर्ल्ड कपपर्यंत फिट राहण्याचं आव्हान रोहितसमोर असेल. तसंच मॅच प्रॅक्टिससाठी त्याला देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावं लागेल, असं भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच रोहित-विराटची रिटायरमेंट?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अद्याप वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही, किंवा त्यांनी 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत ते क्रिकेट खेळतील असंही सांगितलेले नाही. दरम्यान, विराट आणि रोहितचा हा दौरा ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यांचा शेवटचा दौरा असेल, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून रोहित आणि विराटला फेअरवेल देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. 'विराट आणि रोहित आपल्या देशात खेळताना पाहण्याची ही शेवटची वेळ असू शकते. त्यामुळे आम्ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांना साजेसा निरोप देऊ', असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग म्हणाले आहेत.