बुधवार, गुरूवार आणि शुक्रवारी होणाऱ्या डब्ल्यूपीएल सामन्यांची तिकीट विक्री उपलब्ध नाही, त्यामुळे चाहत्यांना या 3 दिवसांमध्ये होणारे सामने स्टेडियममध्ये बसून पाहता येणार नाहीत. या तीन दिवसांमध्ये नवी मुंबईमध्ये दिल्ली आणि मुंबई विरुद्ध युपी वॉरियर्स आणि आरसीबी-गुजरातचे सामने होणार आहेत. डब्ल्यूपीएलच्या सामन्यांची तिकीट विक्री करणाऱ्या अधिकृत वेबसाईट आणि ऍपवर या तीनही दिवसांच्या सामन्यांची तिकीटं उपलब्ध नाहीत, त्यामुळे हे सामने प्रेक्षकांशिवायच खेळले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
15 जानेवारीला मुंबई आणि नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यामुळे गुरूवारी दिल्ली आणि मुंबईच्या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सामन्याच्या आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार का नाही? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
17 जानेवारीला होणाऱ्या सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू आहे. या दिवशी मुंबई आणि यूपी तसंच आरसीबी आणि दिल्ली यांच्यात मॅच होणार आहे. यानंतर डब्ल्यूपीएलचे उरलेले सामने हे बडोद्यामध्ये खेळवले जातील. निवडणुका असल्यामुळे मतदानाच्या काळात सुरक्षा प्रदान करता येणार नाही, असं पोलिसांनी बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त समोर आलं आहे.
'आम्हाला दोन मॅच (14 आणि 15 जानेवारी) प्रेक्षकांशिवाय आयोजित करावे लागू शकतात. पोलिसांच्या सूचनांनंतर आम्ही याचा विचार करत आहोत, पण आतापर्यंत यावर निर्णय झालेला नाही', असं बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पोर्टस्टारला सांगितलं आहे.
निवडणुकीमुळे परिणाम झालेल्या मॅच
14 जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
15 जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
16 जानेवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
