प्राजक्ता यांना सुरुवातीला वैमानिक बनण्याचे स्वप्न पाहिले होतं. त्याबद्दल त्यांना खूप अप्रूप होतं. "वय वाढतं तसं स्वप्न बदलतात," असं त्या एका मुलाखतीदरम्यान म्हणाल्या. नंतर बिझनेस वूमन बनण्याची इच्छा झाली. मात्र, प्राजक्ताच्या वडिलांचे स्वप्न होते की, त्यांनी सरकारी अधिकारी व्हावं. वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी अॅग्रीकल्चरची पदवी घेतली आणि त्यानंतर बँकिंगमध्ये करिअर करण्याचा विचार केला.
advertisement
सहा महिने बँकिंगची तयारी केली, पण अर्ध्या मार्काने मुलाखत हुकली. २०१९-२० चा तो काळ होता. "मला त्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं होतं," अशी भावना मनात होती. मग, कोणतीच दिशा मिळत नसताना MPSC करून पाहण्याचा निर्णय घेतला.
२०२१ पासून प्राजक्ता यांच्या MPSC अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. चांगले क्लास आणि योग्य मेंटॉर मिळाले. मात्र, २०२२ ची मेन्स (मुख्य परीक्षा) हातून थोडक्यात निसटली. या अपयशाने त्या थोड्या खचल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला. पण स्वप्न अजूनही जिवंत होते! लग्नाचा निर्णय घेतला खरा, पण सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न सोडलं नाही. २०२३ मध्ये पुन्हा प्रिलिम्स परीक्षा दिली आणि ती यशस्वीरित्या क्लिअर केली.
निकाल लागला तेव्हा प्राजक्ता यांचा एकच निर्धार होता, "आता सोडायचं नाही. काहीही झालं तरी आता मागे हटायचं नाही." मेन्स परीक्षेसाठी हातात फक्त चार महिने शिल्लक राहिले होते. त्यांनी स्वतःला चार महिने आयसोलेट केलं. सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं आणि शंभर टक्के डेडिकेशन दिलं. यादरम्यानच्या काळात प्राजक्ता त्यांचं लग्न झालं. पण कुटुंबाची साथ आणि स्वतःची जिद्द यामुळे लग्नानंतरही फोकस हलला नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परीक्षेची तयारी त्यांनी संयम ठेवून सांभाळली.
अखेरीस मेहनतीला यश मिळाले. MPSC च्या रँकिंगमध्ये तिने तिसरा क्रमांक पटकावला आणि त्यांची निवड असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स (ACST) म्हणून झाली. स्वप्न आणि जबाबदारी यांचा योग्य समन्वय साधून मिळवलेले हे यश प्राजक्ता यांच्या जिद्दीची आणि तयारीची ही कहाणी प्रत्येक तरुणीसाठी प्रेरणादायी आहे.
