स्कायरूट एरोस्पेस कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि सहसंस्थापक भारत डाका यांनी सांगितलं, की 'संस्थेच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन आणि विक्रम-वनचं उद्घाटन या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी होणं हा आमच्यासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे.''हिंदुस्तान टाइम्स'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
विक्रम-वन या रॉकेटविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या.
- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 300 किलो वजनाची पेलोड्स लो अर्थ ऑर्बिट अर्थात पृथ्वीजवळच्या कमी उंचीच्या कक्षेत नेऊन सोडण्याची क्षमता विक्रम वन या प्रक्षेपण वाहनामध्ये म्हणजेच रॉकेटमध्ये आहे.
advertisement
- हे रॉकेट पूर्णतः कार्बनपासून बनलेलं आहे. अनेक उपग्रह कक्षेत सोडण्याची त्याची क्षमता आहे. त्यात थ्री डी प्रिंटेड लिक्विड इंजिनचाही समावेश आहे.
- स्कायरूट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बायटल सॅटेलाइट्स म्हणजेच कक्षेतले उपग्रह सोडू शकणाऱ्या जगातल्या काही मोजक्या रॉकेट्समध्ये या रॉकेटचा समावेश होतो.
- हे रॉकेट सातमजली इमारतीएवढं उंच असून, या कंपनीने बनवलेलं दुसरं रॉकेट आहे. याआधी या कंपनीने बनवलेल्या रॉकेटचं नाव विक्रम एस असं होतं. ते खासगी कंपनीने तयार केलेलं देशातलं पहिलं रॉकेट होतं आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचं यशस्वीरीत्या प्रक्षेपण झालं होतं.
- आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या इस्रोच्या केंद्रातून विक्रम एस हे खासगी रॉकेट प्रक्षेपित करणारी स्कायरूट ही पहिली कंपनी ठरली.
- भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे पितामह ज्यांना मानलं जातं, त्या विक्रम साराभाईंना मानवंदना म्हणून रॉकेटला विक्रम हे नाव देण्यात आलं आहे.
गेल्या काही वर्षांत भारताची अंतराळ क्षेत्रातली कामगिरी अधिकाधिक उत्तम होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा भारताने यशस्वी करून दाखवल्या आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने गगनभरारी घेतलीच आहे. चांद्रमोहीम, सौरमोहीम, गगनयान अशा वेगवेगळ्या मोहिमा भारत राबवत आहे, त्यात यश मिळवत आहे. या सगळ्यात खासगी क्षेत्रही महत्त्वाचा हातभार लावत असल्याचं विक्रम-वन या रॉकेटवरून स्पष्ट होतं.