मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची मेल सेवा असलेल्या Gmailबाबत एक मोठा धोका निर्माण झाला आहे. Googleने हॅकिंगच्या धोक्यांमुळे एक मोठा इशारा केला आहे. गुगलने 2.5 अब्जाहून अधिक Gmail युझर्ससाठी एक मोठा Security Alert जारी केला आहे. 'ShinyHunters' नावाचा एक हॅकिंग ग्रुप गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असून, ते फिशिंग (phishing) मोहिमेद्वारे युझर्सच्या डिजिटल खात्यांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी गुगलने युझर्सना तातडीने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
शायनीहंटर्स (ShinyHunters) नावाचा हा गट अनेक उच्च-प्रोफाइल डेटा लीक प्रकरणांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुगलने युजर्सना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारचे हल्ले त्यांच्या digital footprintला गंभीर धक्का पोहोचवू शकतात, असा इशाराही दिला आहे.
हल्ल्याची पद्धत
हा हॅकिंग ग्रुप अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने हल्ले करतो. त्यांच्या मुख्य हल्ल्याची पद्धत 'फिशिंग' आहे. यात ते युझर्सना असे ईमेल पाठवतात, जे त्यांना तात्काळ काहीतरी कारवाई करण्यास भाग पाडतात. उदाहरणार्थ: 'तुमच्या खात्यात काहीतरी समस्या आहे, त्वरित लॉगिन करून अपडेट करा' किंवा 'तुम्ही बक्षीस जिंकले आहे, या लिंकवर क्लिक करून माहिती द्या'. एकदा युझर्सने त्यांच्या जाळ्यात अडकून दिलेल्या लिंकवर क्लिक केले की हॅकर्सना त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळतो.
या हल्ल्यांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापरही केला जात आहे. हॅकर्स गुगल सपोर्ट एक्झिक्युटिव्हच्या वेशात पीडितांना फोन करतात आणि त्यांचा विश्वास जिंकतात. फोन कॉल झाल्यावर एक फॉलो-अप ईमेल देखील पाठवला जातो. ज्यामुळे लोकांना संशय येत नाही आणि ते सहज बळी पडतात.
गुगलने दिलेला सल्ला आणि उपाययोजना
गुगलने या धोक्यांना गांभीर्याने घेत संभाव्य बाधित युझर्सना अलर्ट केले आहे. कंपनीने सर्व युझर्सना त्यांचे डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:
पासवर्ड त्वरित बदला: युझर्सना त्यांचे Gmail पासवर्ड त्वरित बदलून अधिक मजबूत आणि अनोळखी पासवर्ड वापरावेत.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा वापर: ही सर्वात प्रभावी सुरक्षा पद्धत आहे. यात पासवर्ड असूनही तुमच्या खात्यात लॉग-इन करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणाऱ्या वन-टाइम पासकोडची (OTP) आवश्यकता असते. यामुळे हॅकर्सना तुमचा पासवर्ड जरी मिळाला तरी ते तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाहीत.
सतर्क रहा: कोणत्याही संशयास्पद ईमेल, लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका. अनोळखी स्त्रोतांकडून आलेले ईमेल उघडताना विशेष काळजी घ्या.
डिजिटल सुरक्षितता: गुगलने स्पष्ट केले आहे की- हे हल्ले केवळ तुमच्या Gmail खात्यापुरते मर्यादित नाहीत. हॅकर्स तुमच्या Gmail खात्यावर नियंत्रण मिळवून बँक, ऑनलाइन शॉपिंग आणि इतर महत्त्वाच्या सेवांवरील तुमच्या डिजिटल ओळखीचा गैरवापर करू शकतात.