अनेकांना वाटतं की हे केवळ डिझाइनचा भाग आहे किंवा एखादा मायक्रोफोन असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? हा साधा दिसणारा काळा ठिपका प्रत्यक्षात आयफोनमधील सर्वात प्रगत तंत्रज्ञानापैकी एक आहे. चला तर मग, जाणून घेऊया या 'ब्लॅक डॉट'मागचं नेमकं गुपित काय आहे.
आयफोनच्या कॅमेऱ्याशेजारील तो 'काळा ठिपका' नेमका काय आहे?
आयफोनच्या प्रो मॉडेल्समध्ये (उदा. आयफोन 17 प्रो, 16 प्रो इ.) फ्लॅशलाइटच्या खाली असलेला हा काळा ठिपका म्हणजे LiDAR (Light Detection and Ranging) सेन्सर आहे. हे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की याचा वापर अंतराळ संशोधन (NASA) आणि स्वयंचलित कारमध्येही (Self-driving cars) केला जातो. ॲपलने 2020 मध्ये आयफोन 12 प्रो पासून याची सुरुवात केली आणि आता तो प्रो मॉडेल्सचा अविभाज्य भाग बनला आहे.
advertisement
हा 'ब्लॅक डॉट' नक्की काय काम करतो?
हा छोटासा सेन्सर तुमच्या फोनमध्ये अनेक महत्त्वाची कामे बॅकग्राउंडला करत असतो.
अंधारातही जबरदस्त फोटोग्राफी: कमी प्रकाशात (Low Light) फोटो काढताना कॅमेऱ्याला फोकस करणे कठीण जाते. अशा वेळी LiDAR सेन्सर प्रकाश लहरी फेकून वस्तूचे अंतर मोजतो आणि कॅमेऱ्याला सेकंदाच्या काही भागात अचूक फोकस मिळवून देतो. यामुळेच आयफोनचे नाईट मोड पोर्ट्रेट फोटो इतके स्पष्ट येतात.
ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR): जर तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्ये नवीन सोफा कसा दिसेल हे पाहायचे असेल, तर AR अॅप्स याच सेन्सरचा वापर करून तुमच्या खोलीचा 3D नकाशा तयार करु शकता.
मोजमाप करणे (Measuring): आयफोनमधील 'Measure' अॅप वापरून तुम्ही कोणत्याही वस्तूची लांबी-रुंदी मोजू शकता. हे काम हा सेन्सर अत्यंत अचूकपणे करतो.
हा सेन्सर आपल्या आसपास कोणती वस्तू आहे किंवा माणसे उभी आहेत का, याचा पत्ता लावू शकतो. दृष्टी नसलेले किंवा अंध लोकांसाठी हे एक महत्त्वाचे 'एक्सेसिबिलिटी' फीचर म्हणून काम करते.
कसा काम करतो हा सेन्सर?
LiDAR सेन्सरमध्ये एक 'लाईट एमिटर' (Light Emitter) आणि एक 'रिसीव्हर' असतो. एमिटरमधून अदृश्य प्रकाश लहरी बाहेर पडतात आणि समोरच्या वस्तूवर आदळून पुन्हा रिसीव्हरकडे येतात. हा प्रकाश परत येण्यासाठी किती वेळ लागला, यावरून फोनचे अल्गोरिदम वस्तू आणि कॅमेरा यातील नेमके अंतर ठरवते.
तो 'काळा' का दिसतो? या सेन्सरवर असलेली काळी लेयर एक संरक्षक कवच म्हणून काम करते. ती दृश्य प्रकाश (Visible Light) शोषून घेते, पण इन्फ्रारेड प्रकाश लहरींना सहजपणे येण्या-जाण्यासाठी वाट करून देते.
हे तंत्रज्ञान केवळ आयफोनच्या 'Pro' आणि 'Pro Max' मॉडेल्समध्येच पाहायला मिळते, सामान्य मॉडेल्समध्ये हा सेन्सर नसतो. विशेष म्हणजे, तुम्ही हा सेन्सर मॅन्युअली चालू किंवा बंद करू शकत नाही; तो गरज पडेल तेव्हा आपोआप आपले काम सुरू करतो.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आयफोन प्रो मधून फोटो काढाल, तेव्हा लक्षात ठेवा की त्या छोट्या काळ्या ठिपक्यामुळेच तुमचा फोटो इतका 'परफेक्ट' येत आहे.
