ट्रायनं मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजेच एमएनपी नियमांमध्ये बदल केलाय. एमएनपी सुविधा 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या नियमात नऊ वेळा बदल करण्यात आलाय. या नव्या नियमानुसार, जर तुम्ही नुकतेच तुमचे सिम बदलले असेल, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करू शकणार नाही. अशा परिस्थितीत मोबाईल क्रमांक दुसऱ्या नेटवर्कवर ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना किमान सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचं ट्रायनं स्पष्ट केलंय. या नवीन नियमामुळे ग्राहकांची सुरक्षितता वाढणार असल्याचा दावा करण्यात आलाय.
advertisement
म्हणून केला नियमात बदल
फ्रॉड आणि स्पॅम रोखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. यामुळे मोबाईल नंबर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरक्षित होईल, आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. जर तुमचे सिम हरवले असेल किंवा खराब झाले असेल, तर तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या स्टोअरमध्ये जाऊन सिम बदलू म्हणजेच स्वॅप करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून वैध ओळखपत्र द्यावं लागेल.
तर, युनिक पोर्टिंग कोड येणार नाही
ट्रायच्या नव्या नियमानुसार सिम स्वॅप केल्यानंतर किमान 7 दिवस तुम्ही तुमचा नंबर दुसऱ्या नेटवर्कवर ट्रान्सफर करू शकणार नाही. सिम बदलून 7 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला नसेल, तर अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या संबंधित ग्राहकाला युनिक पोर्टिंग कोड म्हणजेच यूपीसी देऊ शकणार नाहीत. यूपीसी कोड हा असा कोड आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दुसऱ्या नेटवर्कवर ट्रान्सफर करू शकता. मात्र सिम स्वॅप करणाऱ्यांना यासाठी सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. इतर कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर नवीन सिम मिळू नये, यासाठी हा बदल करण्यात आलाय.
दरम्यान, मोबाईल धारकांच्या सुरक्षेच्या दृष्टिनं या नियमात बदल केला असून त्याचा कितपत फायदा होतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.