ठाणे ते भिवंडी अवघ्या काही मिनिटांत
मुंबई- नाशिक महामार्गावरील बहुप्रतिक्षित भिवंडी बायपास मार्गाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते भिवंडी दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असून सध्या कोंडीमुळे दीड ते तीन तास लागणारा प्रवास अवघ्या सात ते दहा मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढे समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी झाल्याने हा मार्ग अधिक वेगवान ठरणार आहे.
advertisement
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी पट्टा गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांनी भरलेला आहे शिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा रस्ता उद्योग, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
यामुळे 2018 साली ठाणे-भिवंडी बायपास मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ठेकेदार नेमून काम सुरू झाले होते. मात्र कोरोनाच्या काळात या प्रकल्पाला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर वाढत्या कोंडीमुळे 2022 मध्ये हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला. तरीही कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कधी पर्यंत होणार मार्ग पूर्ण?
या मुद्द्यावर संसदेत खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेदरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधत बायपास रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. अखेर सरकारकडून मार्च 2026 ची अंतिम मुदत जाहीर झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे
