नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या वर्दळीच्या ठिकाणी अचानक गोळीबाराचा आवाज आल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली. इथं काही अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.
advertisement
गँगवारचा संशय?
हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार 'गँगवार'मधून घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती, त्याचाच हा परिणाम असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. भरदिवसा अशा प्रकारे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
