संयुक्त मोजणीला सुरुवात
दोन्ही राज्यांमध्ये सीमावाद मिटवण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. वेवजी ग्रामपंचायत हद्दीतील वादग्रस्त जागेची मोजणी सध्या सुरू आहे. या मोजणीसाठी पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगावचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भूमी लेख अधिकारी उपस्थित आहेत. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून ही संयुक्त मोजणी पार पडत आहे.
advertisement
किती अतिक्रमण झाले, होणार स्पष्ट
या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण महाराष्ट्र सीमा हद्दीत आले आहे, हे स्पष्ट होणार आहे. वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे हा नवा वाद निर्माण झाला होता आणि आता प्रशासकीय स्तरावर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिकांचा प्रशासनावर आरोप
या संयुक्त मोजणीच्या वेळेबद्दल मात्र स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने ही मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन केवळ वेळ मारून नेत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला हा सीमावाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्रशासनाने गंभीर पाऊले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मोजणीच्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
