समृद्धी महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा टप्पा
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या 23.80 किमी लांबीच्या प्रकल्पाचे सुमारे 83 टक्के काम पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अखेरीस हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
advertisement
पावसात वाहतुकीचा ताण कमी होणार?
हा मार्ग सुरू झाल्यास पावसाळ्यात ठाणे आणि भिवंडी परिसरात होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबईहून समृद्धी महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही प्रवास अधिक वेगवान होईल.
भिवंडी आणि नाशिक भागात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण जेएनपीटी आणि गुजरातकडून येणारी हजारो अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. रस्ता अरुंद आणि खड्डेमय असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते.
2021 मध्ये सुरू झालेला प्रकल्प वेगात
2021 पासून एमएसआरडीसी या प्रकल्पाचे काम हाती घेतले. नव्या साकेत पुलावरून अलीकडेच वाहतूक सुरू झाली आहे. इतर पुलांची कामेही लवकरच पूर्ण होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्य रस्त्याचे 19.30 किमी आणि सेवा रस्त्याचे 16.33 किमी काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माजिवडा, साकेत, खारेगाव आणि भिवंडी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
