मैदानावरील वादात मध्यस्थी करणं जिवावर बेतलं
मिळालेल्या माहितीनुसार, गावदेवी मैदान परिसरात क्रिकेट खेळताना एका 13 वर्षीय मुलाचा वाद झाला होता. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी त्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली. हा प्रकार पाहून रोहित मोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच हस्तक्षेपातून वाद अधिक वाढत गेला.
यानंतर मोरे, अमित कीर आणि आरोपी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र हा प्रकार एवढा वाढला की आरोपी पटनेशा आणि चव्हाण यांनी चाकू काढून रोहित मोरे व अमित कीर यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रोहित मोरे गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून क्रिकेटच्या किरकोळ वादातून जीवघेणी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
