मुंब्रा : मध्य रेल्वेवरील मुंब्रा हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. मात्र, सध्या दोन दिवसांत घडलेल्या दोन घटनेमुळे मुंब्रा हादरले आहे. मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये सलग दोन दिवसांत दोन मृतदेह सापडले आहेत. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं हे दोन्ही मृत्यू अपघाती आहेत की काही संशयास्पद कट कारस्थानाचा भाग याबाबतचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत.
advertisement
मुंब्रा खाडी बनली रहस्यमय मृत्यूची साखळी!
मिळालेल्या माहितीनुसार, रेतीबंदर जवळ गुरुवारच्या दिवशी साधारण दुपारी एका महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा खाडीत अज्ञात पुरूषाचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं या दोघांच्या मृत्यूचे कारण अपघात आहे की कोणता घातपात आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरू आहे.
सर्वप्रथम कोणी पाहिला मृतदेह?
मुंब्रा येथील एका गणेश विसर्जन घाटाजवळील रेतीबंदर खाडीमध्येसाधारणपणे 10 वाजताच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना दिसला. या तरुणाचे अंदाजे वय 25 ते 30 दरम्यान असलेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी गेले. पोलिस आणि मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला.
मुंब्रा पोलिसांनी या मृतदेहाची ताबडतोब नोंद घेऊन तो पुढील कार्यवाहीसाठी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी आसपासच्या हरवलेल्या व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळखदेखील अद्याप पटलेली नाही, त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे.
मुंब्रा परिसरात या दोन सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नेमकं काय चाललंय या खाडीत? असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन करताना दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
