घडलं काय?
नालासोपारा करारीबाग परिसरात अल्पवयीन मुलीवर 18 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मैत्रीच्या नावाखाली मैत्रिणीचा विश्वास संपादन करून तिला आपल्या घरी बोलावून हे कृत्य करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि आरोपी युवक यांची काही दिवसांपासून ओळख होती. मैत्री वाढल्याचे भासवत आरोपीने मुलीला भेटण्याचे कारण सांगून स्वतःच्या घरी बोलावले. मुलगी आरोपीच्या घरी गेली असताना त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
advertisement
या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये प्रचंड संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. वाढत्या मैत्रीच्या नावाखाली तरुण मुलींना जाळ्यात ओढण्याच्या प्रकारांना आता आळा घालण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शाळा-कॉलेज परिसरातही मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आल्याने नालासोपारात भीतीचं सावट पसरलं असून नागरिक प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशी जोरदार मागणी करीत आहे.
