कॅडबरी जंक्शन-गायमुख मेट्रो 4 सुरू होण्याची तारीख जवळ
अलीकडेच या मेट्रो प्रकल्पाची चाचणी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. सध्या या चाचणीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे मेट्रो सुरू होण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत. मेट्रो 4 सेवा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीला चार मेट्रो स्थानकांपर्यंत यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. मेट्रो प्रकल्प 4 चा पहिला टप्पा हा गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकांदरम्यान सुरू होणार आहे. त्यानंतर उर्वरित सहा स्थानकांपर्यंत ट्रायल रन सध्या सुरू असून सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रो सेवेला अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.
advertisement
कोण-कोणते असणार थांबे?
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. गायमुख मेट्रो स्टेशन ते कॅडबरी जंक्शनपर्यंतचा हा प्रवास सुलभ आणि जलद होणार आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रो 4 अंतर्गत एकूण 10 स्थानके असतील. यामध्ये कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गव्हाणपाडा आणि गायमुख या स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रो 4 प्रकल्पाची एकूण लांबी 32.32 किलोमीटर इतकी असून पुढे मेट्रो 4A मार्गिका त्याला जोडली जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर 32 स्थानके असतील. पहिल्या टप्प्यातील 10 स्थानके सुरू झाल्यानंतर ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
