नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज सिंग (वय 31) हे व्यवसायाने शेफ असून ते आपल्या मित्रांसह दिगंबर रावत (वय 30), दीपक बिस्त (वय 25) आणि मुकेश कुमार (वय 24) मानपाडा येथे राहतात. हे चौघेही एकाच हॉटेलमध्ये काम करतात. गुरुवारी सुट्टी असल्याने पंकज सिंग घरीच होते.
त्यानंतर जेवण करून ते थोड्या वेळासाठी आराम करत असतानाच शेजारी राहणारे साहिल ठाकूर (वय 30) यांनी येऊन रूमच्या समोरील जागा साफ करण्यास सांगितले. सिंग यांनी "ही माझी जबाबदारी नाही" असे सांगत साफसफाईस नाही करणार असे सांगिल्याने साहिल चिडला. त्यानंतर वाद चिघळत गेला आणि काही क्षणांतच संतापाच्या भरात साहिलने बांबू उचलला. त्याने थेट पंकज सिंग यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सिंग यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्या डाव्या हातालादेखील दुखापत झाली आहे.
advertisement
आवाज ऐकून सिंग यांचे मित्र दिगंबर रावत बाहेर आले असता, साहिल आणि त्याच्या एका मित्राने त्यांच्या मित्रांनाही जखमी केले. परिसरात सुरु असलेला राडा पाहून स्थानिकांनी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
या घटनेची माहिती मिळताच चितळसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंकज सिंग यांच्या तक्रारीवरून साहिल ठाकूर आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ साफसफाईसारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हिंसाचारामुळे ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
