वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमधील चकमकीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. या हल्ल्यामागे जैश उल फुर्सानचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एचजीबी अर्थात हाफिज गुल बहादूर यांच्याशी संबंधित असणारी ही संघटना एकेकाळी पाक सैन्यासोबत काम करत होती. पण अलीकडेच या संघटनेनं टीटीपीशी हातमिळवणी केली आहे.
advertisement
नेमका हल्ला कसा झाला?
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात ज्या पद्धतीने हा हल्ला झाला, त्यानुसार हा पूर्व नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. हल्लेखोरांनी सुरक्षा दलांचे लक्ष विचलित करण्यासाठी दोन कार बॉम्बचा वापर केला. पहिला हल्ला केल्यानंतर सर्व सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले, याचवेळी दहशतवाद्यांनी मेन टार्गेटवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बन्नू कॅन्टोन्मेंटच्या सुरक्षा भिंतीवर हल्ला केला. यानंतर त्यांनी आतमध्ये घुसून गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाने पाच ते सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. तपास यंत्रणांकडून याचा तपास केला जातोय.
दुसरीकडे, सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका महिला आत्मघातकी बॉम्बरने फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) च्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला तर चार जण जखमी झाले होते.पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कलाट जिल्ह्यातील मुगलझाई भागात राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला झाला. एका महिला आत्मघातकी बॉम्बरने केलेला हा हल्ला दुर्मिळ घटनांपैकी एक आहे. सोमवारी घडलेला हा दहशतवादी हल्ला ताजा असताना आता मंगळवारी पाकिस्तानात आणखी एक दहशवादी हल्ला झाला आहे.
