काय आहे 'ऑपरेशन गझब लिल-हक' आणि त्याचा अर्थ?
पाकिस्तानने आपल्या या लष्करी मोहिमेला 'ऑपरेशन गझब लिल-हक' असे नाव दिले आहे. हा एक अरबी शब्दसमूह असून त्याचा अर्थ 'सत्यासाठीचा क्रोध' किंवा 'न्यायासाठीचा प्रकोप' असा होतो. अरबी भाषेत 'गझब' म्हणजे राग किंवा प्रलय, 'लिल' म्हणजे साठी आणि 'हक' म्हणजे सत्य किंवा न्याय. पाकिस्तानचा दावा आहे की, ही कारवाई त्यांनी आपल्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी आणि 'सत्याच्या बाजूने' केली आहे. मात्र जागतिक स्तरावर या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याची टीका होत आहे.
advertisement
युद्धाचा घटनाक्रम: ठिणगी कशी पडली?
दोन्ही देशांमधील हा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून टोकाला पोहोचला होता. आता गेल्या 24 तासात अधिकृत युद्धाला सुरुवात झाली आहे.
22 फेब्रुवारी: पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती.
गुरुवार सकाळ: अफगाण सैन्याने या हल्ल्याचा सूड घेत पाकिस्तानचे 55 पेक्षा जास्त सैनिक ठार केले. अनेकांना जिवंत पकडले आणि पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर कब्जा मिळवला.
गुरुवार मध्यरात्री: आपल्या 55 सैनिकांच्या मृत्यूने हादरलेल्या शहबाज शरीफ सरकार आणि जनरल असीम मुनीर यांनी तातडीने 'ऑपरेशन गझब लिल-हक'ची घोषणा केली आणि अफगाणिस्तानवर प्रतिहल्ला चढवला.
मध्यरात्रीचा थरार: काबुल ते कंधारपर्यंत बॉम्बवर्षाव
पाकिस्तानी लष्कराने आपल्या लढाऊ विमानांनी आणि जड तोफखान्याने अफगाणिस्तानच्या काबुल, कंधार, नंगरहार, पक्तिया आणि इतर सीमावर्ती भागांतील लष्करी तळांना लक्ष्य केले.
पाकिस्तानी लष्कराचा दावा: पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानुसार त्यांनी तालिबानच्या अनेक चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत त्यांनी तालिबानचे ब्रिगेड आणि बटालियन मुख्यालय, दारूगोळा डेपो, टँक आणि तोफा नष्ट केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने सुमारे 133 तालिबानी लढाऊ सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे.
अफगाणिस्तानचा पलटवार: अफगाण तालिबान सरकारने पाकिस्तानचे हे आकडे फेटाळून लावले आहेत. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
नेत्यांची विधाने आणि 'खुली जंग'
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ड्युरंड लाईनवर वाढलेल्या संघर्षाला "खुली जंग" (Open War) असे संबोधले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की तालिबानी सैन्याने 'विनाकारण' केलेल्या गोळीबारामुळे त्यांच्या सैन्याचे नुकसान झाले होते, ज्याचा बदला आता घेतला जात आहे. दुसरीकडे तालिबानने पाकिस्तानवर सीमा वादावरून अवाजवी प्रतिक्रिया देण्याचा आणि निष्पापांची हत्या करण्याचा आरोप केला आहे.
सद्यस्थिती
सध्या ड्युरंड लाईनवर परिस्थिती अत्यंत भीषण आहे. जमीन आणि आकाश अशा दोन्ही मार्गांनी दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील अनेक भागात कत्लेआम माजला आहे, तर अफगाण सैन्यानेही जमिनीवरून पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना खिंडार पाडले आहे. या महायुद्धामुळे संपूर्ण दक्षिण आशियात घबराटीचे वातावरण असून हजारो नागरिक या संघर्षात अडकले आहेत.
