वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) या संस्थेच्या माजी सीईओ लिंडा मॅकमोहन यांना आपल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री केलं जाणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण 17 वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी लिंडा मॅकमोहन यांच्या पतीचं डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये मुंडण केलं होतं. त्या जुन्या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ ट्रम्प यांच्या आताच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
advertisement
ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे, की शिक्षण हा विषय आम्ही पुन्हा एकदा राज्यांकडेच सोपवू. त्या प्रयत्नांचं नेतृत्व लिंडा यांच्याकडे असेल. सरकारमध्ये जवळपास चार हजार पदांवर भरती करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. लिंडा मॅकमोहन यांना कनेक्टिकट बोर्ड ऑफ एज्युकेशन या संस्थेत दोन वर्षांच्या, तर सॅक्रेड हार्ट युनिव्हर्सिटी या खासगी कॅथलिक संस्थेच्या एका मंडळात 16 वर्षांच्या कामाचा अनुभव आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं. डब्ल्यूडब्ल्यूईचं मुख्य कार्यकारी अधिकारी पददेखील त्यांनी भूषवलं आहे. 2009 साली त्या डब्ल्यूडब्ल्यूई संस्थेतून बाहेर पडल्या.
लिंडा यांच्या परिवाराल ट्रम्प जवळून ओळखतात. 1980च्या दशकात लिंडा यांचे पती विन्स मॅकमोहन यांनी डब्लूडब्ल्यूई रेसलमॅनिया 4 आणि 5 याचं प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. ते खूप मोठे सोहळे होते आणि ते अटलांटिक सिटीतल्या ट्रम्प प्लाझामध्ये आयोजित करण्यात आले होते. 2007 साली रेसलमॅनिया 23 या सोहळ्यात अशी नाट्यमय घटना घडली, की जिची कोणी कल्पनाही केली नसेल. बॅटल ऑफ दी बिलिअनेअर्समध्ये एक एप्रिल 2007 रोजी रिंगमध्ये झालेल्या कथित भांडणात ट्रम्प यांनी विंक्स मॅकमोहन यांचं चक्क मुंडण केलं होतं.
शोमॅन असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एपिसोडमध्ये गर्दीत हजारो डॉलर्स उधळले होते. तिथे या दोन्ही अब्जाधीशांनी आपापल्या वतीने लढण्यासाठी एकेका डब्ल्यूडब्ल्यूई पहिलवानाची निवड केली होती. ट्रम्प यांनी बॉबी लॅश्ले, तर मॅकमोहन यांनी उमागा याची निवड केली होती. यात जो पराजित होईल त्याला रिंगमध्ये सर्वांसमोर मुंडण करण्याची शिक्षा देण्यात येणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार हे घडलं.
