गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांची मालिका ऐकू आली, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ते स्फोटाचे स्वरूप आणि स्थान निश्चित करत आहेत. वॉल्टन विमानतळाजवळील लाहोरमधील गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवर अनेक स्फोट ऐकू आले. लोक घाबरून घराबाहेर पळाले आणि धुराचे लोट पाहिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियामधून समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रोन द्वारे हा हल्ला केला गेला आहे.
advertisement
लाहोर हवाई क्षेत्र बंद
भारताकडून झालेल्या कारवाईनंतर हवाई हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तान सरकार मध्यरात्री पुन्हा जागे झाले आणि रात्री उशिरा लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. बुधवारी पाकिस्तानने देशभरातील हवाई क्षेत्र 48 तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, नवीन आदेशानुसार कराचीचे हवाई क्षेत्र बंद केलं नाही.
लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. लोक घाबरून रस्त्यावर उतरले. असीम मुनीरच्या जिहादी धोरणांमुळे पाकिस्तानच्या रस्त्यांवर युद्धाला आमंत्रण मिळाले आहे, अशी चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे.
दरम्यान, भारताने केलेल्या लष्करी कारवाईअंतर्गत भारतीय हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.
