मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जिया राज्यातील फोर्ट स्टीवर्ट या ठिकाणी बुधवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात लॉकडाउन लावण्यात आला आहे. अमेरिकेचा पूर्वेकडेचा हा भाग महत्त्वाचा आर्मी बेस आहे. या ठिकाणी १० हजाराहून अधिक सैन्य आणि त्यांचे कुटुंब राहतात. या गोळीबाराला अमेरिकेच्या सैन्याने दुजोरा दिला आहे. तर या गोळीबारात काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात अद्याप मृतांची माहिती समोर आली नाही.
advertisement
(Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा दणका, रशियाकडून तेल खरेदीमुळे चिडले, भारतावर 50 टक्के टॅरिफ)
दरम्यान, "आम्ही या ठिकाणी नेमकं काय घडलं आहे, याचा अंदाज घेत आहे. काही शूटर असल्याची माहिती समोर आली आहे", अशी माहिती लेफ्टनेट कर्नल एंजेल टॉमको यांनी दिली आहे. फोर्ट स्टीवर्टने फेसबुक अलर्ट जारी केला असून कर्मचाऱ्यांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. दारं आणि खिडक्या बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आर्मी बेसवरील सर्व गेट बंद करण्यात आले आहे. जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अमेरिकनं सैन्य आणि प्रशासन घटनेवर नजर ठेवून आहे. अद्याप हल्ला करणाऱ्यांची माहिती समोर आली नाही. या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण असून संपूर्ण परिसरात लॉकडाउन लावण्यात आला आहे.
फोर्ट स्टीवर्ट काय आहे?
फोर्ट स्टीवर्ट हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील एक मोठे लष्करी तळ (U.S. Army post) आहे. हे मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील सर्वात मोठे लष्करी तळ असून, सुमारे २,८०,००० एकर (१,१०० चौ.किमी.) क्षेत्रात पसरलेले आहे. हे लष्करी तळ मुख्यत्वे प्रशिक्षण, लष्करी वाहनांची तैनाती आणि लष्करी दलांना जगभरात त्वरीत पाठवण्यासाठी वापर केला जातो. फोर्ट स्टीवर्टची स्थापना १९४० मध्ये Anti-Aircraft Artillery Training Center म्हणून झाली. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर प्रशिक्षण आणि युद्धकैद्यांच्या छावणीसाठीही करण्यात आला होता. १९५६ मध्ये याला कायमस्वरूपी 'फोर्ट' (किल्ला) चा दर्जा मिळाला. सध्या फोर्ट स्टीवर्ट हे अमेरिकेच्या ३री पायदळ डिव्हिजन (3rd Infantry Division) चे मुख्यालय आहे. हा लष्करी तळ लिबर्टी आणि ब्रायन जिल्ह्यांमध्ये (counties) प्रामुख्याने स्थित आहे, पण त्याचे काही भाग इव्हान्स, लाँग आणि टॅटनल जिल्ह्यांमध्येही पसरलेले आहेत.