बापाचा गोळीबार अन् मुले कपाटात लपली
या भीषण घटनेच्या वेळी घरात लहान मुलेही उपस्थित होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू होताच तीन मुलांनी जीव वाचवण्यासाठी घरातील एका कपाटात धाव घेऊन लपून बसले. या मुलांपैकी एका मुलाने प्रसंगावधान राखत थेट 911 वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. या फोनमुळेच पोलिसांना तात्काळ हालचाल करता आली.
advertisement
ग्विनेट काउंटी पोलिसांनी मृतांची ओळख स्पष्ट केली असून, आरोपी विजय कुमारची पत्नी मीमू डोगरा (वय 43), गौरव कुमार (33), निधी चंदर (37) आणि हरिश चंदर (38) यांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
मोठ्या मुलाचे प्रसंगावधान
ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. स्थानिक वेळेनुसार सुमारे 2.30 वाजता ब्रुक आयव्ही कोर्ट परिसरातील 1000 ब्लॉकमधील एका घरातून गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना घरात चार प्रौढ व्यक्तींचे मृतदेह आढळून आले. सर्वांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. घरात उपस्थित असलेली तीनही मुले भीतीपोटी कपाटात लपली होती. यापैकी एका मुलाने केलेल्या वेळेवरच्या 911 कॉलमुळेच पोलिस काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचू शकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने या गोळीबारात मुलांना कोणतीही इजा झाली नाही. सध्या या मुलांना कुटुंबातीलच एका सदस्याने आपल्या ताब्यात घेतले आहे.
विजय कुमार (वय 51) याच्यावर चार गंभीर हल्ल्याचे (Aggravated Assault) गुन्हे, चार फेलनी मर्डरचे आरोप दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती फॉक्स5 अटलांटाने दिली आहे. याशिवाय त्याच्यावर चार मॅलिस मर्डरचे गुन्हे, बालांवरील क्रूरतेचा पहिल्या दर्जाचा एक गुन्हा आणि तिसऱ्या दर्जाचे दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान अटलांटा येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे. दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी गोळीबाराच्या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून शोकाकुल कुटुंबाला शक्य ती सर्व मदत दिली जात आहे, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
