दरम्यान, अमेरिका भारत आणि पाकिस्तानला सातत्याने चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करत आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, याच पार्श्वभूमीवर अमेरिका मध्यस्थी करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
advertisement
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, "रुबियो यांनी दोन्ही नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि संवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ब्रूस यांनी ही परिस्थिती “अत्यंत नाजूक आणि धोकादायक” असल्याचे सांगितले. पत्रकारांनी रुबियो यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेबद्दल विचारणा केली असता, त्या म्हणाल्या, "सध्या चर्चा सुरू आहे. पण त्या खासगी आहेत. माध्यमांमध्ये त्याचे तपशील देणे योग्य ठरणार नाही."
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांनीही भारत-पाकिस्तान वादाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. "आम्ही वाढत्या संघर्षाबद्दल चिंतेत आहोत. शांतता राखण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न करू," असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या संघर्षात आता पाकिस्तानला उघड सपोर्ट करणारं कोणीही अजून तरी पुढे सरसावले नाहीत असंच दिसत आहे.
